असुरक्षित नगरसेविकांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास शिवसेना नेत्यांकरवी मनाई करून गळचेपी सुरू केली आहे. पण त्याचवेळी विनोद घोसाळकर यांना पत्रकार परिषद घेण्यास पक्षश्रेष्ठींनी मुभा दिल्याने आता शिवसेनेतही नेतृत्वाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. आपल्या विरोधात केलेले आरोप कपोलकल्पित असल्याचे घोसाळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा जबाब घेतला. जबाबात शीतल म्हात्रे यांनी घोसाळकर पितापुत्रावर ठपका ठेवला आहे. शुक्रवारी रात्री असुरक्षित नगरसेविकांनी पोलिसांना गुन्ह्य़ाचे गांभीर्य समजावून घोसाळकर यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी आता अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी रात्रीच घोसाळकरांनी समर्थकांसमवेत पोलीस ठाण्यात जाऊन शक्तिप्रदर्शन केले. इतकेच नव्हे, तर शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरोधात केलेले आरोप कपोलकल्पित असल्याचे सांगितले. चौकशी यंत्रणांना आपण सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत, तसेच अटकपूर्व जामीन घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझ्यावरील आरोपांमागे दुसऱ्या पक्षाचे षडयंत्र आहे. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाही तर दोन्ही नगरसेविकांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला. माझा आणि नार्वेकर यांचा संबंध नाही. ते उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव आहेत. नार्वेकर आणि एनएल बिल्डर्स यांच्या संबंधांविषयी मला काही माहिती नाही, असा खुलासाही घोसाळकर यांनी केला. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने घोसाळकर यांना पत्र पाठवले असून ३० जानेवारीपर्यंत स्वतची बाजू मांडण्याची मुदत दिली आहे.
दरम्यान शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या भेटीत त्यांनी आता शांत राहावे, असा इशारावजा सल्लाही म्हात्रे यांना दिला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्याशी शनिवारी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. शांत राहा आणि दोन दिवस वाट पाहा, असे त्यांनी या दोघांना सांगितले. मात्र आपल्याला शांत राहण्याचा आदेश देऊन घोसाळकर यांना पत्रकार परिषद घेण्याची मुभा दिल्याबद्दल या नगरसेविका नाराज झाल्या आहेत.
नगरसेविकांची हकालपट्टी?
असुरक्षित नगरसेविकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या वावडय़ा शनिवारी काही नगरसेवक उठवत होते. त्यामुळे दहिसर परिसरात प्रचंड नाराजीचे वातावरण होते.