राज्यात रविवारी दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी ६१ जणांना साथीची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत या साथीचे ९९ बळी गेले आहेत.
रविवारी स्वाइन फ्लूमुळे ठाणे, रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्य़ात प्रत्येकी एक तर नागपूर येथे तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. संपूर्ण राज्यात ९११ जणांनी स्वाइन फ्लूची लागण झाली असून ३९ जण एच१एन१ विषाणूने आजारी असून त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ५२१ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर २९१ जणांवर अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सर्व सरकारी तसेच निमसरकारी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा असून त्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शनिवारी दिली.