वाढत्या महागाईमुळे वाहनचालकांचा निर्णय; सर्वसामान्य रहिवाशांना फटका

मुंबई : पेट्रोल-डिझेलची झालेली दरवाढ आणि वाढलेली महागाई या पाश्र्वभूमीवर मुंबईतील कोणाचेच नियंत्रण नसलेल्या आणि अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या शेअर टॅक्सी-रिक्षाच्या चालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. शेअर टॅक्सी-रिक्षा सीएनजीवर धावत असल्या, तरी वाढत्या महागाईमुळे शेअर टॅक्सी-रिक्षाचालकांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छोटय़ा मार्गावर शेअर टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू आहे. अवघ्या १० ते १५ रुपये आकारून प्रवाशांना सेवा दिली जाते. मुंबईमधील तब्बल ६० टक्के ठिकाणी सुरू असलेली शेअर टॅक्सी, रिक्षा सेवा अनधिकृतपणे चालवण्यात येत असून त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. अशा शेअर टॅक्सी, रिक्षा स्टॅण्डवरील कारभार एखादी व्यक्ती चालवत असते. सरकारी यंत्रणा, स्थानिक गुंड यांच्याकडून अनधिकृतपणे शेअर टॅक्सी, रिक्षा चालवणाऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी ही व्यक्ती पाहत असते. त्यासाठी टॅक्सी, रिक्षाचालकांकडून या व्यक्तीला दर महिन्याला बिदागी दिली जाते. रेल्वे स्थानकांपासून दाटीवाटीने असलेली लोकवस्ती, बाजारपेठा, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी शेअर टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू केली आहे.

विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने काही महिन्यांपूर्वी बसभाडेवाढ केली. मात्र त्याचे उलट परिणाम दिसू लागले आहे. अनेक प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवून शेअर टॅक्सी, रिक्षाचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. परिणामी बेस्टपुढे नवे संकट उभे राहिले आहे. केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. भाजीपाला आणि अन्य वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे संसाराचे गाडे हाकणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे बेस्ट बसच्या भाडय़ाच्या तुलनेत कमी दरात शेअर टॅक्सी, रिक्षा सेवा उपलब्ध करणाऱ्या चालकांनीही भाडय़ाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छोटय़ा मार्गावरील शेअर टॅक्सी, रिक्षाचे दर वाढण्याची चिन्हे आहेत.

शेअर टॅक्सी आणि रिक्षा पेट्रोल-डिझेलवर नव्हे, तर सीएनजीवर धावत आहेत. सरकारने सीएनजीच्या दरात वाढ केलेली नाही. मात्र गेली दोन वर्षे सरकारने टॅक्सी, रिक्षाच्या भाडय़ात वाढही केलेली नाही. पण त्याच वेळी महागाई मात्र वाढत आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आल्यामुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. टॅक्सी-रिक्षा सीएनजीवर धावत असल्या तरी वाढत्या महागाईमध्ये दिवसेंदिवस संसाराचे गाडे पुढे रेटणे अवघड बनत आहे. त्यामुळे शेअर टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडय़ात वाढ करणे क्रमप्राप्त बनले आहे, अशी प्रतिक्रिया शेअर टॅक्सी, रिक्षाचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.