प्रसाद रावकर
मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या संचलनाची तयारी सध्या सुरू असून मैदानात दररोज सकाळी सुरू असलेल्या सरावामुळे पुन्हा धूळ उडू लागल्याने शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी त्रासले आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी शिवाजी पार्क मैदानात पोलीस दल, अग्निशमन दलातर्फे संचलन करण्यात येते. त्यासाठी काही दिवस आधी संचलनाचा सराव करण्यात येतो. मैदानात मातीचा भराव टाकून संचलनासाठी व्यवस्था करण्यात येते. मात्र, संचलन पार पडल्यानंतर मैदान पूर्ववत करण्यात येत नाही. त्यामुळे मैदानाचे नुकसान होतेच, पण अतिरिक्त मातीमुळे मैदान असमतोल होते. त्याचा त्रास मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना होतो आणि सतत उडणाऱ्या धुळीमुळे आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याचा धोका वाढत आहे.
संचलनामुळे आता तर रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणावर धूळ साचू लागली आहे. त्यामुळे सकाळी चालण्यासाठी अथवा धावण्यासाठी येणारे रहिवासी, तसेच पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सोसावा लागत आहे. परिणामी, आता रस्त्यावरील धुळीचाही बंदोबस्त करावा लागणार आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
शिवाजी पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने वर्षां संचयन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मैदानात गवताचा गालिचा तयार करण्यात येत आहे. मैदानाच्या काही भागात गवताचा गालिचा तयारही झाला होता. मात्र २ एप्रिल रोजी झालेल्या मनसेच्या सभेनंतर मैदानाची वाताहात झाली. मैदानातील काही ठिकाणचा पृष्ठभाग असमतोल झाला, तसेच गवताचेही नुकसान झाले होते. त्यामुळे पालिकेने मैदानात पुन्हा गवत लावले. अद्याप गवताची पूर्ण वाढ झालेली नाही.
१ मे रोजी मैदानात संचलन होणार आहे. यानिमित्त मैदानात मोठय़ा संख्येने वाहने येतात. त्यामुळे पुन्हा एकदा गवताची वाताहात होऊन मैदान उजाड होण्याचा धोका आहे, अशी भीती या परिसरातील रहिवाशी पंकज दामनिवाला यांनी व्यक्त केली. मैदानातून धुळ उडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे या उपाययोजना फोल ठरत आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत करदात्यांनी कराच्या रुपात जमा केलेल्या पैशांचा अपव्यय होत आहे. वारंवार मैदानाचे नुकसान होत असेल तर मैदानात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या जी-उत्तर विभागाला पाठवले आहे.
शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षां संचयन प्रकल्प राबविताना त्याच्या आराखडय़ातच या मार्गाचा समावेश करण्यात आला होता. धूळ उडू नये म्हणून मैदानात पाणी फवारण्यात येत आहे. पुढील महिन्याभरात गवताची चांगली वाढ होईल. -किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी-उत्तर विभाग
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2022 रोजी प्रकाशित
शिवाजी पार्क पुन्हा धुळीत ;महाराष्ट्र दिनाच्या संचलनाची तयारी सुरू
महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या संचलनाची तयारी सध्या सुरू असून मैदानात दररोज सकाळी सुरू असलेल्या सरावामुळे पुन्हा धूळ उडू लागल्याने शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी त्रासले आहेत.
Written by प्रसाद रावकर

First published on: 28-04-2022 at 01:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji park washed again preparations maharashtra day underway amy