काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिका या राज्यपातळीवर वेगळय़ा असल्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील काँग्रेसला स्थानिकांच्या प्रश्नावर मात्र मनसेचे वारे लागले आहे. ‘महावितरण’च्या विद्युत साहाय्यक पदावर परप्रांतीय नव्हे तर केवळ महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार रुजू झाल्याचे कळताच सिंधुदुर्गातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कंत्राटी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या उमेदवारांना मारहाण करून परत जाण्याची धमकी दिली. या घटनेमुळे राज्यात आता ‘परप्रांतीय’वादाबरोबरच परजिल्ह्यातील लोकांबाबतचाही वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी सिंधुदुर्गातच शिक्षक भरतीवेळी दुसऱ्या जिल्ह्य़ातून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात आंदोलन झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता ‘विद्युत साहाय्यक’ पदावरील नियुक्तीच्या निमित्ताने झाली आहे. ‘महावितरण’तर्फे ‘विद्युत साहाय्यक’ची सुमारे सात हजार पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात नांदेड, चंद्रपूर, लातूर, जळगाव भागातील काही उमेदवार ‘विद्युत साहाय्यक’ म्हणून सिंधुदुर्गात नियुक्त झाले. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांची नियुक्ती झाल्याचे समजल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कंत्राटी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले व ‘परजिल्ह्यातील उमेदवार का नेमता?’, असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच विद्युत साहाय्यक म्हणून नियुक्त झालेले दत्तहरी मच्छेवार (नांदेड), संदीप पवार (नांदेड), नामदेव राठोड व अनंत भुरे (लातूर), देविदास खावसे (चंद्रपूर) या उमेदवारांना मारहाण केली.
याबाबत सिंधुदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण व आयटीआय झालेले तरुण आठ-दहा वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असताना, त्यांना प्राधान्य मिळण्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्य़ांतून उमेदवार रुजू झाल्याने ते संतापले. जिल्ह्यात पात्र माणसे असताना दुसऱ्या जिल्ह्य़ातून आलेल्यांची नियुक्ती होणे चुकीचे आहे.
मुळात सिंधुदुर्गात रोजगार कमी आहे. अशा वेळी बाहेरच्या जिल्ह्य़ांतील मुले आली तर आमच्या मुलांनी उपाशी राहायचे का,’ असा सवालही त्यांनी केला.
निषेधार्ह प्रकार
सिंधुदुर्गात रुजू झालेल्या विद्युत साहाय्यकांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. ते दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी महाराष्ट्रातीलच होते. त्याचबरोबर नियुक्ती प्रक्रियाही नियमानुसार झाली आहे. – अजय मेहता
व्यवस्थापकीय संचालक, महावितरण