विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सहा आमदार उद्या मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार भाजपात जात असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

या सहा आमदारांमध्ये सोलापूरमधील माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे बुलडाणातील चिखलीमधील राहुल बोंद्रे, मालाडमधील असलम शेख, शिरपूरमधील काशीराम पवार, साक्रीतील डी. एस. अहिरे, आणि पंढरपूरमधील भारत भालके यांचा समावेश असुन, हे सहाही आमदार उद्या (सोमवार) अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष उमेदवारी जाहीर करत आहे. काँग्रेसने देखील ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवाय युतीच्या जागा वाटपाची घोषणा होण्याअगोदरच शिवसेनेकडून काही देखील विद्यमान आमदारांसह उमेदवारांना एबी फार्मचे वाटप करण्यात आलेले आहे. तर भाजपाकडूनही उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. राज्यात २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.