मुंबई : अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या भूखंडावरील ज्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले तो प्रकल्प अखेर अदानी समुहाच्या कंपनीने ताब्यात घेतला आहे. या प्रकल्पाचे नवे विकासक मे. शिव इन्फ्रा व्हिजन यांच्यासोबत संयुक्त करारनामा करण्यात आला आहे. मे. चमणकर इंटरप्राईझेसकडे हा प्रकल्प होता तेव्हा एल अँड टी यांच्याबरोबर संयुक्त करारनामा करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ६२४ कोटींच्या संयुक्त विकास करारनाम्याच्या माध्यमातून अदानी समुहाला या प्रकल्पात शिरकाव करू दिला आहे.  अण्णानगर, कासमनगर आणि विठ्ठल रखुमाई सहकारी गृहनिर्माण संस्थांचा हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरुवातीला मे. चमणकर इंटरप्राईझेसतर्फे विकसित केला जात होता. या प्रकल्पासोबत नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय, मलबार हिल येथील अतिथीगृह, वाहन चाचणी पथ आणि सेवानिवासस्थाने बांधून घेण्याच्या मोबदल्यात विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) दिला जाणार होता. यापैकी वाहन चाचणी पथ आणि सेवानिवासस्थाने वगळता उर्वरित सर्व बांधकामे मे. चमणकर यांनी केली. मात्र झोपडीवासीयांचे पुनर्वसन वेळेत केले नाही, असा ठपका ठेवत चमणकर यांना या प्रकल्पातून काढून टाकण्याची कारवाई प्राधिकरणाने केली. अदानी समुहाच्या मे. पोर्टसमाऊथ बिल्डकॉन यांच्यासमवेत झालेला हा संयुक्त विकास करारनामा नुकताच नोंदला गेला. सुमारे ३१ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. मे. शिव इन्फ्रा व्हिजनतर्फे पृथ्वीजीत चव्हाण आणि पोर्टसमाऊथ बिल्डकॉनच्या वतीने प्रणव अदानी व जॅकबॅस्टियन नाझरेथ यांनी सह्या केल्या आहेत. या नोंदणीची सूची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sra project on andheri rto plot to adani group zws
First published on: 23-05-2022 at 03:38 IST