दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या अनुयायांच्या अनावर गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला, तर ५९ जण जखमी झाले. आपल्या धार्मिक नेत्याच्या निधनामुळे शोकाकुल झालेल्या लाखो अनुयायांच्या शोकभावना या करुण दुर्घटनेमुळे आणखीनच अनावर झाल्या.
अनुयायांच्या गर्दीचा अदमासच न समाजाच्या नेत्यांना न आल्याने गर्दीचे व्यवस्थापन अशक्य होऊन ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारनेही दिले आहेत.
डॉ. सय्यदना यांच्या निधनाचे वृत्त पसरताच त्यांच्या अनुयायांनी सैफी हाऊस या त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत लाखो शोकाकुल अनुयायी निवासस्थानाबाहेर अंत्यदर्शनाच्या ओढीने गोळा झाले होते. सैफी हाऊसच्या आसपासच्या अरुंद रस्त्यांवर ही गर्दी एवढी वाढली, की उभे राहायलाही जागा रस्त्यांवर शिल्लक नव्हती. त्यातच, सैफी हाऊसचे दरवाजेही बंद झाल्याने अनुयायांमध्ये अक्षरश: चेंगराचेंगरी सुरू झाली. श्वास घेणेही अशक्य झाल्याने अनकेजण गुदमरू  लागले. काहीजण बेशुद्ध झाले. उपचारानंतर जखमींपैकी ५६ जणांना घरी पाठविण्यात आले.
लहानग्यांची शोकांतिका
मृतांत लहान मुलांचाही समावेश आहे. ताहिर नोहेब गुडवाला (११) हा त्यापैकीच एक. भेंडीबाजार येथे राहणारा ताहिर सहाव्या इयत्तेत शिकत होता. शुक्रवारी त्याचे काका निधनाचे वृत्त ऐकून मुंबईला आले. ते सोबत ताहिरलाही घेऊन गेले. चेंगराचेंगरीत ताहिरचा दुर्दैवी बळी गेला. मध्यप्रदेशातील हुसेन जरावाला (१५) हा मुलगाही आपल्या आई वडिलांसोबत आला होता. सैफी महलच्या गेटसमोर त्याचे कुटुंबीय थांबले होते. चेंगराचेंगरीत गर्दी अंगावर पडल्याने श्वास गुदमरून तो बेशुद्ध पडला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.