आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतचा ‘करिअर मंत्र’
मनावरील ताबा हा नेमबाजीचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे खेळताना मनात कोणते विचार हवे हे ठरवले पाहिजे. ध्येय निश्चित असल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. आपण अनेकदा काय करू नये याचा विचार करतो. त्यापेक्षा काय करायचे याचा विचार केला तर फायदा होतो, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत हिने दिला. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये राहीने आपली लक्ष्यवेधी कहाणी उलगडली.
‘‘नेमबाजी करताना मनावर ताबा असणे गरजेचे आहे. हा गुण माझ्यात उपजत होता आणि प्रशिक्षकांमुळे व अनुभातून मी प्रगल्भ होत गेले. मुळात उणिवा जाणून घेणे व त्या मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याची वृत्ती आपल्याकडे नाही. ती बाणवून घेतल्यास कामगिरी सुधारते,’’ असेही राही या वेळी म्हणाली. महाराष्ट्रातून महिला नेमबाजपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत, त्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अल्प आहे. यावर राही म्हणाली, ‘‘संमय, स्वत:वरील नियंत्रण आणि समजूतदारपणा हे महिलांमधील उपजत गुण आहेत आणि म्हणूनच नेमबाजीत मुली उजव्या आहोत.’’
क्रीडा साहित्याबाबत भारतातच अधिक चौकशी
नेमाबजीचे साहित्य देशांतर्गत घेऊन फिरणे हे युरोपीय देशांच्या तुलनेत अधिक तापदायक आहे, असे राही म्हणाली. ‘‘नेमबाजपटूंना क्रीडा साहित्य नेताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. तासन्तास विमानतळावर ताटकळत ठेवले जाते. असे प्रकार केवळ भारतातच घडतात. परदेशात असे होत नाही. युरोपियन देशांमध्ये नेमबाजपटूंना प्रमाणपत्र दिले जाते. ते पत्र कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला दाखवल्यास तो अधिक चौकशी करत नाही,’’ असे राहीने सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी महत्त्वाची आहे. एरवी आपली सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची बोंब आपणच मारतो आणि अशी चौकशी झाल्यावर टीकाही करतो. पण, माणसागणिक बदलणारे नियम स्वीकाहार्ह नाहीत. त्यात एकसमानता हवी.’’
परदेशाचे आकर्षण वाटले नाही!
अनेक खेळाडू परदेशात जाताना खूप उत्साही असतात.. तेथे गेल्यावर तेथील पर्यटनस्थळे पाहणे, त्यांवर चर्चा करणे यामध्ये त्यांना रस असतो. पण मला असे कधीच वाटले नाही. परदेशाचे आकर्षण कधी वाटले नाही. परदेशातील विविध ठिकाणांची उत्सुकता मला कधीच वाटली नाही. तेथे गेल्यावरही स्पध्रेसाठीचे शूटिंग रेंज, तेथील सुविधा याचाच विचार मनात असायचा, असे राहीने सांगितले.
संयम आवश्यक
कोणतीही गोष्ट सुरू केल्यानंतर लगेच फळाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यासाठी संयम आवश्यक आहे. आपल्या तंत्राशी एकरूप राहणे आणि त्यात अधिकाधिक सुधारणा करणे, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. नेमबाजीमुळे हिंस्र भावना कमी होतात. त्यामुळे खेळाडू प्रगल्भ होतो, असे राही म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success can achieve if goal is decided says rahi sarnobat