पहिली मेट्रो गाडी मुंबईत दाखल होण्यासाठी सज्ज

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ तीन प्रकल्पातील अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. कायमस्वरुपी कारशेडचा प्रश्न निकाली निघालेला नसताना दुसरीकडे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी, मेट्रो ३ साठीची पहिली गाडी श्रीसिटी येथे तयार असतानाही ती मुंबईत आणणे शक्य नाही. गाडी आणि तात्पुरती कारशेड नसल्याने मेट्रो ३ चाचणी रखडली आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशन (एमएमआरसी)मार्फत ३२.५ किमीच्या लांबीच्या मेट्रो ३ चे काम सुरू आहे. आतापर्यंत एकूण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. ९७ टक्के भुयारीकरण, ८२ टक्के बांधकाम, २२ रुळांचे काम, ७९ टक्के स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे वेगाने सुरू आहेत. मात्र कायमस्वरुपी कारशेड अद्यापही अधांतरीच आहे. कारशेडचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मेट्रो ३ प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आता मेट्रो ३ ची चाचणीही रखडली आहे.

कारशेडचा प्रश्न निकाली लागत नसल्याने एमएमआरसीने मरोळ-मरोशी येथे तात्पुरती कारशेड उभारून चाचणी घेण्यास परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने सहा महिन्यांपूर्वी ही मागणी मान्य केली होती. या परवानगीनंतर एमएमआरसीने तीन महिन्यांत तात्पुरती कारशेड उभारून डिसेंबर २०२१ वा जानेवारी २०२२ मध्ये चाचणी घेऊ असे जाहीर केले होते. आता मार्च २०२२ उजाडण्याची वेळ आली तरी चाचणी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकूणच चाचणी रखडली आहे. एमएमआरसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता त्यांनी तात्पुरत्या कारशेडचे काम अपूर्ण असल्याने चाचणी रखडल्याची माहिती दिली आहे.

आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथे मेट्रो ३ साठी ३१ मेट्रो गाडय़ांची बांधणी सुरू असून यातील पहिली गाडी तयार झाली असून तिची चाचणीही पूर्ण झाली आहे. ही गाडी फेब्रुवारी अखेरीस मुंबईत आणण्यात येणार होती. मात्र तात्पुरत्या कारशेडचे काम अपूर्ण असल्याने गाडी आणून ठेवायची कुठे असा प्रश्न आहे. त्यामुळे कारशेडचे काम पूर्ण झाल्यानंतरच ही गाडी मुंबईत आणण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  तात्पुरत्या कारशेडचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल आणि चाचणी कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत विचारले असता, निश्चितपणे काही सांगता येणार नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.