नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओसारख्या मोठमोठ्या वाहिन्या नावाजलेल्या हॉलीवूड आणि बॉलीवूड निर्माते-दिग्दर्शक, कलाकारांना एकत्र आणून प्रेक्षकांना दर्जेदार आशय देण्याच्या प्रयत्नात असताना ‘झी ५’ या ओटीटी वाहिनीने प्रादेशिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ओटीटी वाहिन्यांवर सध्या प्रादेशिक आशयाची मागणी वाढते आहे, विशेषत: गेल्या वर्षभरात मराठी आशय पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आणि कालावधी या दोन्हींत वाढ झाली आहे, अशी माहिती ‘झी ५’ मराठीच्या व्यवसायप्रमुख हेमा व्ही. आर. यांनी दिली.

‘झी ५’ने पहिलीवहिली ‘अंधारमाया’ ही मराठी वेबमालिका नुकतीच प्रदर्शित केली. पाठोपाठ झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा डिजिटल प्रीमिअर ‘झी ५’वर करण्यात आला. आणि आता अनिस बाज्मी निर्मित, हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित, अमृता सुभाष अभिनित ‘जारण’ हा मराठी चित्रपटही ‘झी ५’वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘प्रादेशिक आशय फक्त त्या त्या भाषेतील प्रेक्षकांपुरती मर्यादित राहत नाही. तो इतर भाषिक प्रांतातसुद्धा पाहिला जातो, हा आमचा आजवरचा अनुभव आहे. विशेषत: मराठी भाषिक आशय आणि प्रेक्षक यासंदर्भात बोलायचं झालं तर गेल्या वर्षीच्या जून महिन्यापेक्षा आता मराठी आशय पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येत १४ टक्क्याने वाढ झाली आहे आणि ओटीटीवरचा मराठी आशय पाहण्याचा कालावधीही ४२ टक्क्यांनी वाढला आहे’, अशी माहिती हेमा व्ही. आर. यांनी दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी आशयासाठी प्रेक्षकांची वाढती भूक आणि मागणी लक्षात घेत झी ५ ने स्वतंत्रपणे मराठी वेबमालिका आणि चित्रपटांचे पॅकेज १२० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

सगळ्याच ओटीटी वाहिन्यांवर हिंदी भाषिक आशय खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण गेल्या एक-दोन वर्षांत प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीशी संबंधित वेबमालिका वा चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळेच विविध भाषिक बाजारपेठेत पाय रोवण्याच्या उद्देशाने मराठीसह सात विविध भाषिक आशय दर महिन्याला १२० रुपये याप्रमाणे स्वतंत्र पॅकेज स्वरूपात ‘झी ५’वर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असंही हेमा यांनी सांगितलं. ‘झी ५’ च्या मराठी भाषेतील आशयासाठी उपलब्ध असलेल्या पॅकेजमध्ये दर महिन्याला नवनवीन मराठी वेबमालिका, झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या चित्रपटांसह इतर निर्मिती संस्थांचा एखादा चांगला मराठी चित्रपट असेल तर तोही ‘झी ५’वर प्रदर्शित केला जाणार आहे. याची सुरुवात ‘जारण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली आहे.

मराठीत दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे, त्याचाही विचार नवनवीन आशयनिर्मितीसाठी केला जात असून त्यासाठी मराठीतील नामांकित तसेच तरुण चित्रपटकर्मींबरोबर काम सुरू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक बाजारपेठ मिळवण्यासाठी ओटीटी वाहिन्यांमध्ये स्पर्धा सध्या ओटीटी आणि प्रादेशिक आशयासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ, इतर ओटीटी वाहिन्यांकडून येणारा प्रादेशिक आशय या सगळ्याचा विचार केला तर खूप स्पर्धात्मक वातावरण आहे. प्रत्येकाला प्रादेशिक प्रेक्षक आपल्या वाहिनीकडे खेचून घ्यायचा आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्याने ओटीटीवर येणाऱ्या प्रेक्षकाला खिळवून ठेवेल असा आशय देत राहणं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची मुळं ज्या भाषेत, संस्कृतीत रुजली आहेत तिथल्या अर्थपूर्ण गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहणं हे सध्या ओटीटी वाहिन्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, असं हेमा यांनी स्पष्ट केलं.

मराठी प्रेक्षकांची पहिली पसंती मराठी भाषेलाच…

मराठी प्रेक्षक पहिली पसंती मराठी चित्रपट – मालिकांनाच देतो याची वारंवार प्रचीती आम्ही घेतलेली आहे. कितीही भव्यदिव्य हिंदी चित्रपट आला किंवा वेबमालिका असली तरी शेवटी तुमचं घर ते घर असतं… तसं मराठी प्रेक्षक हा आपल्या घराशी, भाषेशी जोडलेला आहे, असं मत हेमा यांनी व्यक्त केलं.

मराठी प्रेक्षक अजूनही प्रतीक्षेत…

ओटीटीवरचा प्रेक्षक अजूनही अधिकाधिक मराठी आशय पाहायला मिळेल, या प्रतीक्षेतच आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. ओटीटीवर तेलुगू किंवा तमिळ भाषेतील आशयाचे प्रमाण खूप अधिक आहे, तिथे याआधीच आशयनिर्मिती संदर्भात वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. त्या प्रमाणात मराठीत ओटीटीवर फार निर्मिती झालेली नाही हेही तितकंच खरं… त्यामुळे आम्ही आता नव्या-जुन्या चित्रपटकर्मींबरोबर, लेखकांबरोबर काम करतो आहोत. आणि ते सगळेसुद्धा नवं काही करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. म्हणजे मराठीत आता कुठे सुरुवात होते आहे, असं म्हणता येईल हेही त्यांनी स्पष्ट केलं.