सर्वात जुन्या ‘ग्लोब थिएटर’मध्ये मराठीसाठी खास वेळ
मराठीचा झेंडा टिच्चून मिरवणाऱ्या बेळगाव शहरात आता मराठी भाषिकांना दिलासा देणारी एक गोष्ट उभी राहिली आहे. गेले दीड वर्ष बंद असलेले बेळगावातील सर्वात जुने ‘ग्लोब थिएटर’ शुक्रवारी पुन्हा नव्या स्वरूपात सुरू झाले असून तिथे मराठी चित्रपटांचा किमान एक खेळ लावण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. किशोर बेळेकर दिग्दर्शित ‘येडा’ या चित्रपटाद्वारे या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून पुढील आठवडय़ात हा चित्रपट मराठी भाषिकांना बघता येण्याची शक्यता आहे.
बेळगावात मराठी भाषकांची वस्ती मोठी आहे. मात्र आतापर्यंत बेळगावात मराठी चित्रपट खूपच अपवादात्मक संख्येने येत होते. त्यामुळे हे चित्रपटगृह नव्याने बांधतानाच येथे मराठी चित्रपटांसाठी प्राधान्याने वेळ देण्याचा विचार केला होता, असे ग्लोबचे मालक महेश कुगाजी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आमच्याकडे मराठी चित्रपटांना फारशी मागणी नाही. परंतु आम्ही चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवलाच नाही, तर मागणीही वाढणार नाही. ‘झेंडा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ वगैरे अपवाद वगळता इतर चित्रपट तर येथे येतही नाहीत. त्यामुळे आपण ‘ग्लोब’मध्ये मराठी चित्रपटांना हक्काचा एक खेळ देणार आहोत, असे कुगाजी म्हणाले. ‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’च्या समीर दीक्षित यांच्या मदतीने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले.
‘ग्लोब’विषयी थोडेसे
बेळगावातील बच्चू आणि मुसा हशमभाई या बंधूंनी बांधलेल्या ग्लोब थिएटरमध्ये २२ ऑक्टोबर १९३३ रोजी पहिला चित्रपट दाखवला गेला. हे बेळगावातील पहिले चित्रपटगृह मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे केवळ इंग्रजी चित्रपट दाखवण्यात येत. मात्र त्यानंतर हिंदी चित्रपटांनी ‘ग्लोब’चा ताबा घेतला. बच्चू आणि मुसा यांच्यानंतर युसुफ, सुलतान, इरफान आणि सलीम या हशमभाई बंधूंनी ग्लोबची धुरा पुढे चालवली. मात्र काहीच वर्षांत येथे ‘फक्त प्रौढांसाठी’चे चित्रपट दिसण्यास सुरुवात झाली आणि हे चित्रपटगृह बंदच पडले.
आता महेश कुगाजी यांच्या ‘साई शोभा एण्टरटेन्मेण्ट’ने या चित्रपटगृहाचा ताबा घेतला आहे. बेळगावातील पहिले चित्रपटगृह असा मान असलेल्या ग्लोबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आता मल्टिप्लेक्ससारख्या सुविधा देणारे ग्लोब हे बेळगावातील पहिलेच एकपडदा चित्रपटगृह आहे. त्याचबरोबर या चित्रपटगृहात आता थ्रीडी प्रोजेक्टरचाही समावेश
आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theater in belgaum for marathi movies