भिवंडी रोड रेल्वे स्थानकाजवळील जुचंद्र-कामण गावाच्या हद्दीत रेल्वे रुळांवर डोंबिवली पोलीस पथकाला एकाच कुटुंबातील तीन मृतदेह आढळले आहेत. त्यांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे चालकाने डोंबिवली पोलिसांना शुक्रवारी पहाटे ही माहिती दिली. जगदिश यादव (२३), मंजू यादव (२०) आणि पूजा यादव (अडीच वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.
दीर, वहिनी आणि पुतणी असणारे हे तिघेही उत्तरप्रदेशमधील वाराणसी जिल्ह्य़ातील धरानेपर गावातील मूळ रहिवासी आहेत. सध्या हे कुटुंब मुंबईत पवईतील फिल्टर पाडय़ात राहात होते. जगदिश एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. पुतणी पूजा आजारी असल्याने तिला औषधोपचार करण्यासाठी ते तिघे घराबाहेर पडले होते.