नाटय़विश्वाच्या अनेक समस्यांना मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी नाटय़ परिषद व नाटय़निर्माता संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. मात्र या भेटीमागे सध्या शिवसेना व मनसे या दोन पक्षांच्या चित्रपट सेनांमध्ये सुरू असलेल्या ‘स्टार वॉर’चा हात असल्याचा सूर ऐकू येत आहे. परिषदेच्या शिष्टमंडळात नियामक मंडळाऐवजी पराभूत उमेदवारांचा भरणाच जास्त होता. नाटय़ परिषद आणि नाटय़निर्माता संघासमोर असलेल्या अनेक समस्यांचा पाढा या वेळी मोहन जोशी आणि प्रशांत दामले यांनी उद्धव यांच्यासमोर वाचला. नाटय़ परिषद ही मातृसंस्था असताना नाटय़निर्माता संघाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घ्यायला लागते, याबद्दल काही निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली.
दोन सेनांमध्ये सुरू असलेल्या ‘स्टार वॉर’चा तिसरा अंक शुक्रवारी पाहायला मिळाला. शिवसेनेने आपल्या सेनेच्या कार्यकारी मंडळावर बडय़ा अभिनेत्यांना नेमल्यानंतर ‘मनचिसे’ने दहा बडय़ा कलाकारांना मानद सदस्यत्व बहाल केले. दरम्यान आजच्या भेटी वेळी  चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकरही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav raj star war continued