आग विझवण्यासाठी मिनी रोबो वाहन घेतल्यानंतर पालिकेने आता ५५ मीटर उंचीचे वॉटर टॉवर वाहन खरेदी करण्याचे ठरवले आहे. या टॉवर वाहनामुळे दाटीवाटीच्या झोपडपट्टीमध्ये किंवा उंच इमारतींवर उंचीवरून पाण्याचा मारा करता येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या वाहनासाठी पालिका तब्बल १३ कोटी खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
पालिकेची मुंबईत एकूण ३४ अग्निशमन केंद्रे असून २७० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा दलाकडे आहे. गेल्या काही वर्षांत अग्निशमन दलात अनेक महागडी यंत्रसामुग्री दाखल झाली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये किंवा दाटीवाटीच्या ठिकाणी मोठमोठी अवजड वाहने पोहोचू शकत नाही म्हणून अग्निशमन दलाने रोबोही खरेदी केला होता. मात्र हा रोबोही काही ठिकाणी जिन्यावरून वर चढू न शकल्यामुळे नापास ठरला होता. अशातच आता अग्निशमन दलाने वॉटर टॉवर हे आणखी नवीन व महागडे वाहन खरेदी करण्याचे ठरवले आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नाही. मुख्य रत्यावर उभे राहून आगीवर पाण्याचा फवारा मारून आग विझवावी लागते. अशा ठिकाणी हे ५५ मीटर उंचीचे वॉटर टॉवर उपयोगी पडेल असा प्रशासनाचा दावा आहे. या वाहनावरील वॉटर मॉनिटरमुळे ५० मीटर लांबीपर्यंत समांतर पोहोच मिळत असल्यामुळे दाट लोकवस्ती परिसरात किंवा उंच इमारतीवर वरून पाण्याचा मारा करता येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या वाहनाची किंमत १२ कोटी २७ लाख ४ हजार रुपये असून त्याच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
