मुंबई
आगळ्या आणि कल्पक शैलीतील विविध कार्यक्रम व उपक्रम सादर करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानने सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. दिवाळी पहाट, पावसाळी सहल, ‘एक कलाकार एक संध्याकाळ’, ‘सायंकाळी एक रांगोळी’ ते चतुरंग रंगसंमेलनापर्यंत अनेक कार्यक्रम सांगता येतील. हे सर्व कार्यक्रम चतुरंगच्या खास शिस्तीत आणि पठडीत होत असतात. याच उपक्रमातील ‘मुक्तसंध्या’ हा चतुरंग प्रतिष्ठानचा आणखी एक उपक्रम.
रसिक आणि कलाकार यांच्यात थेट संवाद घडविण्याच्या उद्देशाने चतुरंगने सुरू केलेल्या सांस्कृतिक व्रताला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमाचे आत्तापर्यंत ९३ कार्यक्रम झाले असून ९४व्या मुक्तसंध्येत अभिनेते मकरंद अनासपुरे सहभागी होणार आहेत. स्वत:च्या खास अभिनय शैलीने अनासपुरे यांनी चित्रपट आणि नाटक माध्यमात आपली नाममुद्रा उमटविली आहे. तसेच ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सेवेचा वसाही जपला आहे. चित्रफीत आणि गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर अनासपुरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. रसिकांना कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
- कधी- रविवार, ३ जुलै २०१६
- कुठे- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम)
- केव्हा- दुपारी चार वाजता.
अभय कुळकर्णी यांच्या ‘मालवणी गजाली’
कोकणी माणसाचा स्वभाव मुळात गप्पीष्ट. चार मंडळी एकत्र जमवून गप्पा छाटत बसणे हा त्यांचा आवडता उद्योग. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मालवणी भाषा बोलली जाते. या गप्पांनाच मालवणी भाषेत ‘गजाली’ असे म्हटले जाते. गप्पांमध्ये गावातील भानगडी ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत कोणतेही विषय वज्र्य नसतात. ‘काय रे बाबल्या, आसय खय, दिसाक नाय बरेच दिस. आसय खय म्हणजे काय तात्यान्यू, मीया जातलय खय, हयसरच आसय, सध्या माका वेळच नाय’ असे म्हणून गप्पांना सुरुवात होते आणि या गप्पा कितीही वेळ सुरू राहतात. गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’ या नाटकातून अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनी ही मालवणी भाषा लोकप्रिय केली. ‘पंचमी’ या संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांत वेगवेगळे कार्यक्रम सादर करणारे अभय कुळकर्णी आता मालवणी भाषेतील गप्पा, विनोद आणि इरसाल व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडविणारा ‘मालवणी गजाली’ हा एकपात्री कार्यक्रम घेऊन आले आहेत. कार्यक्रमाचे लेखन, संकल्पना, निर्मिती आणि सादरीकरण कुळकर्णी यांचेच आहे. कार्यक्रमाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- ’ कधी- रविवार, ३ जुलै २०१६
- ’ कुठे- दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा रोड (पश्चिम)
- ’ केव्हा- सायंकाळी सहा वाजता
- छत्री रंगविण्याची कार्यशाळा
कथा, कविता आदी माध्यमांतून मनातील भावना व्यक्त करता येतात. चित्रकला हेही मनातील भाव व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे. विविध रंगांच्या माध्यमातून कागद ते कापडावर चित्र किंवा शब्दांच्या माध्यमातून चित्रकार किंवा अन्य कोणीही व्यक्ती आपले मन मोकळे करू शकते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यात प्रत्येकाची गरजेची आणि आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे छत्री. फक्त काळ्या रंगातच छत्री असण्याचे किंवा पाहण्याचे दिवस गेले.
आता वेगवेगळ्या रंगांमध्ये या छत्र्या पाहायला मिळतात. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेतील ‘छत्री रंगविण्याची कार्यशाळा’ हा उपक्रम मुंबईत पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे. छत्र्यांवर सुलेखन किंवा आपल्याला जे वाटेल ते रंगविण्याचे मार्गदर्शन सुलेखनकार अच्युत पालव या कार्यशाळेत करणार आहेत.
कधी- रविवार, ३ जुलै २०१६.
कुठे- एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, आदर्श नगर, इमारत क्रमांक ३८ समोर, सेंच्युरी बाजार जवळ, वरळी.
केव्हा- सकाळी नऊ ते दुपारी बारा.
कनक सभा आयोजित महिया उत्सव
कनक सभा कला केंद्र यांच्यातर्फे २ आणि ३ जुलैला महिया उत्सव या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २ जुलैला डॉ. सिरी रमा या सरस्वती संकल्पना घेऊन एकल भरतनाटय़म नृत्याचे सादरीकरण करतील. तर ३ जुलैला आनंदा नटनम या संक्लपनेंतर्गत एकल, युगल आणि समूह नृत्याचे सादरीकरण होईल. त्याचप्रमाणे नृत्याला संगत करणाऱ्या संगीतकारांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे. हा नृत्य महोस्तव विनाशुल्क प्रेक्षकांना पाहता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८१९८९२०८१, २५२७३३०२.
- ’ कधी- २ आणि ३ जुलै, २०१६.
- कुठे- म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल (२ जुलै). ’ केव्हा- दुपारी ३.३०
- कुठे- फाइन आर्ट सभागृह, चेंबूर (३ जुलै).
- केव्हा- दुपारी ३.
हिंदी गाण्यांची ‘खुमार’
गायक बिपिन पंडित यांनी २००६ मध्ये जाहिरात, विपणन, जनसंपर्क क्षेत्रांत १८ कलाकारांना घेऊन ‘खुमार’ या हिंदी वाद्यवृंदाची सुरुवात केली. मुंबईसह गुजरात, चेन्नई, बंगलोर आदी ठिकाणी ‘खुमार’चे कार्यक्रम सादर झाले. यंदा ‘खुमार’चे दहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने हिंदी गाण्यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात बिरीन पंडित यांच्यासह सर्वेश मिश्रा, आलोक काटदरे, मीना कामत-प्रभूगावकर, श्रीनिधी घाटगे, हरीश गाला हे गायक सहभागी होणार आहेत. संगीत संयोजन दिनेश घाटे यांचे आहे.
- कधी- शनिवार, २ जुलै २०१६.
- कुठे- इंडियन एज्युकेशन सोसायटीचे माणिक सभागृह, लोटलीकर विद्यासंकुल, लीलावती रुग्णालयासमोर, वांद्रे (पूर्व).
- केव्हा- सायंकाळी साडेपाच वाजता.
- ‘काटेसावर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
उषा मेहता लिखित ‘काटेसावर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत दादर येथे एका कार्यक्रमात होणार आहे. दिनकर गांगल, उषा तांबे आणि डॉ. अरुणा ढेरे हे मान्यवर या कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विदुर महाजन यांच्या सतार वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
- कधी- रविवार, ३ जुलै २०१६.
- कुठे- साने गुरुजी विद्यालय, भिकोबा पाठारे मार्ग, दादर (पश्चिम).
- केव्हा- दुपारी साडेचार वाजता.
