शाळा सोडल्यानंतर विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणणारे.. परदेशातील नातेवाईकांशी अल्पदरात संवाद साधण्याची सुविधा देणारे.. सर्वात लोकप्रिय अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप आता पूर्णत: मोफत होणार आहे. यापूर्वी काही वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी वर्षांला काही दर आकारला जायचा. मात्र सध्या हे अ‍ॅप लोकांसाठी खूप उपयुक्त ठरत असून यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. हा सर्व विचार करता अ‍ॅप मोफत करण्यात येत असल्याचे कंपनीने त्यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे सध्या अब्जावधी वापरकर्ते असून देशातील नव्हे तर देशाबाहेरील लोकांशीही ते या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. या अ‍ॅपचा वापर जगभरात मोठय़ा प्रमाणावर होत आहे. सुरुवातीला एक वर्ष मोफत वापर झाल्यावर काही वापरकर्त्यांना आम्ही दर आकारात होतो. मात्र अनेक व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड उपलब्ध नाही. केवळ पैसे नाहीत म्हणून त्यांचा संपर्क तोडणे आम्हाला योग्य वाटत नसल्याने हे अ‍ॅप पूर्णत: मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचे ब्लॉगवर नमूद करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप असा निर्णय घेणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून तंत्रवर्तुळात होती. पुढे व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती येणार अशी चर्चाही सुरू झाली. या सर्वावर उत्तर देताना ब्लॉगवर नमूद करण्यात आले आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती घेणार नाही. याउलट ग्राहकांना उपयुक्त अशाच सुविधा देणार आहोत. म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप बँका किंवा सेवा पुरवठादार कंपन्यांशी सहकार्य करणार आहेत.