म्हाडा तसेच एमएमआरडीएची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या बाळकुम येथील तनिष्का विनोद मांजरेकर या महिलेला कापुरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. या महिलेने सुमारे १५ ते २० जणांना सुमारे १२ ते १४ लाखांचा गंडा घातला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बाळकुम परिसरात राहणाऱ्या प्रीतम सरवणकर यांना तनिष्काने म्हाडातील अधिकारी आपल्या ओळखीचे असून त्यांच्या माध्यमातून घर मिळवून देते, अशी बतावणी केली होती. त्यासाठी तनिष्काने त्यांच्याकडून एक लाख ६४ हजार रुपये घेतले होते. मात्र, घर मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रीतम यांनी पैसे परत मागितले. त्यावर तिने त्यांना पोलिसात तक्रार केल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. दरम्यान, तनिष्का बुधवारी पहाटे बाळकुम परिसरातील भाडय़ाचे घर सोडून जाण्याच्या तयारीत होती. याबाबत माहिती मिळताच प्रीतम यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तनिष्काला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman arrested in thane for mhada houses fraud