एखाद्या चित्रपटात शोभावा, असा प्रसंग रविवारी रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर घडला. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढणाऱ्या चोराला शीतल पोळ या महिला पोलीस अधिकाऱ्याने धाडसाने पकडले. संतोष काळसकर असे या चोराचे नाव आहे.
रात्री साडेनऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या गाडीतून प्रवास करणाऱ्या मीना धोकटे यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून काळसकरने पळ काढला. धोकटे यांनी चोर, चोर असा ओरडा सुरू केला पण तोपर्यंत गाडी सुरू झाली होती. त्याच गाडीतून घरी परतणाऱ्या पोळ यांनी चोराला पाहिले आणि त्यांनी धाडसाने चालत्या गाडीतून फलाटावर उडी मारून त्याचा पाठलाग सुरू केला व त्याला मुद्देमालासकट पकडले.
काळसकर याला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती.
जामिनावर सुटल्यानंतर तो बेपत्ता होता. पोळ यांनी धाडसाने त्याला पकडल्यामुळे मंगळसूत्र चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोळ या वरळी पोलीस मुख्यालयात काम करतात. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women police dare to arrest chain snatcher