मुंबईकरांकडून सर्वाधिक हाक; चिमण्या पुन्हा नांदण्यासाठी चांगले प्रयत्न
भारतामधील प्रमुख शहरांमधून दूर चाललेल्या चिमण्यांना ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’ अशी आर्त हाक मुंबईकरांकडून सर्वाधिक दिल्याचा दावा चिमणी बचावासाठी लढणाऱ्या एका संस्थेने केला आहे. देशभरातील मोठय़ा शहरांमध्ये हे प्रयत्न होत असले तरी दिल्ली व बंगळूरपेक्षाही मुंबईतील नागरीक याला ज्यादा हातभार लावत असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे आजच्या ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त मुंबईकरांच्या प्रयत्नांचे कौतुक होत असले तरी यात वाढ होण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाढत्या शहरीकरणाच्या रेटय़ात शहरातील प्राणी व पक्षी जगत धोक्यात आले असताना यात आता कमी होत असलेल्या चिमण्यांचाही समावेश आहे.
हल्ली शहरातील कर्णकर्कश आवाजांमध्ये या चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा लोप पावेल की काय? अशी भितीही व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा चिमण्या नांदाव्यात यासाठी देशातील दिल्ली, मुंबई, बंगळूर व अन्य मोठय़ा शहरांमध्ये हरतऱ्हेने प्रयत्न होताना दिसत आहेत.
मात्र, यात मुंबई शहराने आघाडी घेतल्याचे चिमण्यांसाठी दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या नाशिकच्या ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ या संस्थेचे म्हणणे आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महम्मद दिलावर यांनाच गेल्या आठ वर्षांपूर्वी जागतिक चिमणी दिन असावा, अशी कल्पना सुचली होती.
यावर त्यांनी २० ते २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या साथीने प्रयत्न केल्यावर २०१० साली हा जागतिक चिमणी दिन अस्तित्वात आला. सध्या ५० देशांमध्ये हा दिन साजरा केला जातो.
मुंबईत चांगले प्रयत्न
मुंबईत चिमणी बचावासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना दिलावर म्हणाले की, मुंबईत चिमणीच्या संवर्धनासाठी आमच्या संस्थेचे नोंदणीकृत ५ हजाराहून अधिक कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते ‘बर्ड फिडर’चा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतात.
या ‘बर्ड फिडर’मध्ये धान्य ठेवलेले असते, त्यातले धान्य चिमण्या खातात. गेल्या दहा वर्षांत मुंबईत १ लाखांहून अधिक बर्ड फिडर वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईतील अनेक नागरीक स्वतहून काय प्रयत्न करता येतील यासाठी संपर्क साधत असून दरवर्षी जागतिक चिमणी दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिमण्या या माणसांच्या अवती-भोवती राहणे पसंत करतात. चिमण्यांना पाणी, खाद्य आणि घरटे उपलब्ध करून दिल्यास त्या शहरात नक्की परततील. तसेच त्या जर नामशेष होण्याच्या मार्गावर पोहचल्या तर ही मानवासाठीही धोक्याची सूचना असेल.
– मोहम्मद दिलावर, चिमणी संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World sparrow day celebration in mumbai