नागपूर : दुकानात जाणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला ओळखीच्या आरोपीने दुचाकीवर बसवले. तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. दरम्यान, त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. संधी मिळताच चिमुकली जीव मुठीत घेऊन पळाली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केला. लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी शेख आसिफ गनी (४८) रा. आजमशाह चौक याला अटक केली.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापार – विवाहित महिलेची….

आरोपी आसिफ ई-रिक्षा चालवतो. त्याला दोन मुले आहे. पीडिता १३ वर्षांची आहे. बुधवारी मुलीच्या आईने तिला काही कामासाठी घराजवळच्या दुकानात पाठविले. जवळच दुकान असल्याने चिमुकली पायीच निघाली. दरम्यान आरोपी आसिफची नजर मुलीवर गेली. त्याने तिला थांबवून विचारपूस केली. ‘मी तुझ्या कुटुंबातील सर्व लोकांना ओळखतो,’ असे सांगून तिला दुचाकीवर बसविले. दुकानात घेऊन गेला. त्यानंतर काही दूर अंतरावर घेऊन गेल्यानंतर आरोपीने मुलीला आईस्क्रीम घेऊन दिले. त्याने ओळखी दाखविल्याने मुलीला काही संशय आला नाही. दुचाकी शिकविण्याचा बहाणा करीत आरोपी चिमुकलीला निर्जनस्थळी घेऊन गेला. आरोपी तिच्या मागे बसला आणि अश्लील चाळे करू लागला. चिमुकलीने विरोध दर्शविला असता, पैशांचे प्रलोभन दिले. तरीही तिने विरोध केला. दरम्यान दुचाकीचे पेट्रोल संपले. तो गाडी ढकलत पुढे नेत होता. ही संधी साधून चिमुकली पळाली. आरडाओरड करीत तिने लोकांना गोळा केले. विचारपूस करून नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि लकडगंज पोलिसांच्या सुपूर्द केले. पोलिसांनी पीडितेची आस्थेने विचारपूस केली. भयभीत झालेल्या मुलीने सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 year old girl molested in a deserted place by known person adk 83 zws