नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशभरात रेल्वे अपघातात सुमारे ७९ हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिली. २०२० ते २०२५ या कालावधीत हे मृत्यू झाले. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या अहवालातून हा तपशील समोर आला आहे.
रेल्वेच्या धडकेने हत्तीचा मृत्यू झाल्याची शेवटची घटना जुलैमध्ये पश्चिम बंगालच्या मदनापूर जिल्ह्यातील खरगपूर-टाटानगर विभागात घडली. एका वेगवान एक्स्प्रेसने धडक दिल्यामुळे तीन हत्तींचा मृत्यू झाला. असे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय आणि रेल्वेकडून संयुक्तपणे अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
भारतीय वन्यजीव संस्थेने मंत्रालय आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करून ‘रेषीय पायाभूत सुविधांचे परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना’ या शीर्षकाची मार्गदर्शक तत्त्वे देखील प्रसिद्ध केली आहेत. ज्यामुळे संबंधित संस्थांना मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी रेल्वे आणि इतर प्रकल्पांची रूपरेषा आखण्यास मदत होणार आहे. याशिवाय हत्तींच्या देशभरातील ‘कॉरिडॉर’मधील रेल्वे रुळांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पूर्वसूचना प्रणाली लागू करण्याची योजना देखील केंद्र सरकार आखत आहे. तामिळनाडूतील मदुक्कराई वनक्षेत्रात वनखात्याने ही प्रणाली सुरू केली आणि ती बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरली. त्यामुळे आता इतर राज्यांमध्येही हा प्रयोग केला जाणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
हत्तींचे संवर्धन आणि संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २०२३ आणि २०२४मध्ये भारतीय वन्यजीव संस्थेत रेल्वे अधिकाऱ्यांसाठी क्षमता-निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. सुमारे तीन हजार ४५२ किलोमीटर व्यापणाऱ्या १२७ रेल्वे रुळांचे सर्वेक्षण केल्यानंतर ‘भारतातील असुरक्षित रेल्वे पट्ट्यांवर हत्ती आणि इतर वन्यजीवांची रेल्वेशी धडक कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय’ या शीर्षकाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.
घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना
– हत्तींच्या अधिवासात रेल्वेच्या वेगावर निर्बंध घालणे
– रुळांजवळ हत्तींचे भूकंपीय सेन्सर-आधारित शोध – असुरक्षित ठिकाणी भुयारी मार्ग, रॅम्प आणि कुंपण बांधणे