अकोला : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या कार्यालयाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी व अद्ययावतीकरण सेवांसाठी सुधारित दर निश्चित केले आहेत. या सेवांच्या शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची मोठी झळ पोहोचत असून दरवाढीमुळे रोष व्यक्त केला जात आहे.
आधार कार्ड भारतातील प्रत्येक रहिवासी नागरिकांसाठी सक्तीचे आहे. नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण आधार नोंदणी करू शकतो. आधार तपशील अद्ययावत ठेवणे देखील गरजेचे असते. आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या सेवांमध्ये मात्र १ ऑक्टोबरपासून मोठी वाढ केली. विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना त्याचा चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. नवीन दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू असतील. नवीन आधार नोंदणी ही पूर्वी प्रमाणे मोफत आहे. ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अद्ययावतीकरण देखील मोफत ठेवण्यात आले. इतर बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाचे शुल्क आता १२५ रुपये करण्यात आले आहे. पूर्वी ते १०० रुपये होते. ‘डेमोग्राफिक’ अद्ययावत आधार केंद्रामध्ये किंवा ऑनलाइन ७५ रुपये, जे पूर्वी ५० रुपये होते. पत्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, दस्तऐवज अद्ययावत आधार नोंदणी केंद्रामध्ये किंवा पोर्टलवरील शुल्क आता ५० ऐवजी ७५ रुपये आकारण्यात येत आहे.
ई-केवायसी, आधार शोध व रंगीत प्रिंट दर सुद्धा ३० वरून ४० रुपयांवर नेण्यात आले. या वाढलेल्या दरामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. ५० रुपयांचे शुल्क थेट ७५ रुपयांवर नेऊन शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत, तर १०० रुपयांवरून १२५ रुपये शुल्क आकारत २५ टक्क्यांपर्यंत दरवाढ केली. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
सुधारित दराचे फलक लावणे बंधनकारक
सुधारित दरांचे फलक आधार केंद्रावर दर्शनी भागावर स्पष्टपणे लावणे केंद्र चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून सुधारित दरानुसारच शुल्क आकारले जात आहे. नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन बंधनकारक असल्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. नागरिकांनी आधार केंद्र चालकाविरुद्ध तक्रार असल्यास संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार शाखा येथे तक्रार दाखल करता येणार आहे.