आरोग्यमंत्री व खासदार अडसूळ यांची पदावरून हकालपट्टी करा | Loksatta

आरोग्यमंत्री व खासदार अडसूळ यांची पदावरून हकालपट्टी करा

संवैधानिक पदावरील व्यक्तीकडून हा प्रकार अशोभनीय आहे.

आरोग्यमंत्री व खासदार अडसूळ यांची पदावरून हकालपट्टी करा
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ

आम आदमी पक्षाची मागणी

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या इशाऱ्यावरून खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत गुंडय़ांकरवी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. संवैधानिक पदावरील व्यक्तीकडून हा प्रकार अशोभनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या अडसूळांची खासदारकी तर डॉ. सावंत यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे डॉ. अलीम पटेल यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मेळघाटमध्ये एका वर्षांत ५०० कुपोषित बालक, ५०७ बालक, १८० नवजात बालक, २२ गर्भवती महिला दगावल्या आहे. मृत्यू झालेल्यांत एप्रिल व मे या दोनच महिन्यातील ४४ बालमृत्यू, २० नवजात मृत्यूचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या घोटी गावातही कुपोषणामुळे एका बालकाचा नुकताच मृत्यू झाला. वर्ष २०१४ मध्ये हे मृत्यू ३०६ असताना ते आता ५०० हून अधिक नोंदवल्या गेले आहे. तेव्हा या विषयावर जाब विचारण्याकरिता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आरोग्यमंत्र्यांकडे अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमाला गेले. प्रश्न- उत्तर सुरू असताना आप कार्यकर्त्यांवर आरोग्यमंत्री संतापले. त्यांनी खासदार अडसूड यांना इशारा करताच गुंडय़ांच्या मदतीने आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.

शांतीपूर्ण मार्गाने मागण्या मांडत असताना या पद्धतीची मारहाण अशोभनीय आहे. तातडीने केंद्र सरकार, राज्यपाल, राष्ट्रपतींकडे या संवैधानिक पदावरील व्यक्तींची हकालपट्टीची मागणी केल्याची माहिती निवृत्त सैन्य अधिकारी डॉ. पटेल यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आपकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांकडून आरोपींना संरक्षण दिल्या जात असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. मेळघाटमधील कुपोषण व बालमृत्यू हे गंभीर प्रश्न असून शासनाने तातडीने एक कृती आराखडा तयार करून त्यावर नियंत्रणाचे प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरजही याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंगरोषण अरडक उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-07-2017 at 03:33 IST
Next Story
कुमारीमातेच्या मुलीची ‘जाती’साठी पायपीट