उपमहानिरीक्षकांची ‘मॅट’ला माहिती; १४ हजार उमेदवारांना माहिती देण्याचे कारागृह उपमहानिरीक्षकांचे आदेश
राज्य सरकारने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील रक्षक पदाची भरती प्रशासकीय कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे ‘मॅट‘मध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शिवाय पोलीस शिपाई पदाच्या भरतीची जाहिरात नव्याने काढण्यात आली आहे. मात्र जुनी रक्षक पदाची भरती रद्द झाल्याची माहिती अद्याप १४ हजार उमेदवारांना देण्यात आलेली नाही.
नागपूर विभागाची १०३ कारागृह रक्षक पदाची भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. प्रशासकीय कारणास्तव नागपूर विभागाची कारागृह रक्षक पदाची भरती प्रक्रिया घेता येणार नाही. सदर भरती प्रक्रिया अशंत: किंवा पूर्णत: रद्द करण्याचे अधिकार शासनाकडे सुरक्षित आहेत, असे १ जानेवारी २०१४ च्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया पूर्ण रद्द करण्यात आली, अशी माहिती ‘मॅट’ला देण्यात आली. २०१४-२०१५ च्या कारागृह रक्षक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात यावी. या मागणीसाठी पीडित उमेदवार कल्पना सोनटक्के आणि सलमान हनीफ शेख यांनी ‘मॅट’कडे दाद मागितली होती. त्यावर सरकारने कारागृह रक्षकांची १०३ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगितले.
कारागृह शिपायांच्या १२५ पदासाठी ३ फेब्रुवारी २०१६ ला जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पहिली भरती रद्द झाल्याची माहिती उमेदवारांना न देताच दुसरी जाहिरात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय नव्याने भरतीची जाहिरात काढण्यात आली. त्यामध्ये पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली नाही. यामुळे शेकडो उमेदवारांनी ‘वयोमर्यादा’ ओलांडली आहे. भरती रद्द करण्याचे अधिकार सरकारला आहे. परंतु प्रशासकीय घोळामुळे भरती रद्द होत असेल तर त्याचा भरुदड उमेदवारांना कशासाठी. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना किमान एक संधी देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. दरम्यान, भरती रद्द झाल्याची वर्तमानपत्रात जाहिरात देऊन उमेदवारांना कळवण्यात यावे तसेच संकेतस्थळावर देखील ते प्रसिद्धी करण्यात यावे, असे भरती रद्द करण्याच्या आदेशात गृहविभागाने म्हटले आहे. उमेदवारांची संपूर्ण माहिती एमकेसीएलकडून प्राप्त करावी. अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी तयार करण्यात यावी आणि संबंधितांचे धनादेश जिल्हा कारागृह अधीक्षकांकडे देण्यात यावे. याबाबत वर्तमानपत्रात सूचना देण्यात यावी. नागपूर मध्यवर्ती कारागृह उपमहानिरीक्षकांकडून उमेदवाराच्या यादीत तसेच परीक्षा शुल्काची रक्कम प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांना रक्कम पोहचती करावी, असे आदेश कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिले आहेत.
अर्ज भरण्यास मुदतवाढ
पोलीस शिपाई भरती २०१५-२०१६ साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस १८ फेब्रुवारी २०१६ होती. ती मुदत आता ४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला जाहिरात २०१५-२०१६ साठीच्या पोलीस भरतीकरिता देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार यापूर्वी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्या उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
जुन्या अर्जदारांना एक संधी हवी
रक्षक पदाची भरती रद्द करण्यात आल्याने त्यावेळी अर्ज करण्यासाठी पात्र शेकडो उमेदवार आता ‘वयोमर्यादे’तून बाद झाले आहे. प्रशासकीय घोळामुळे भरती रद्द होत असेल तर त्याचा भरुदड उमेदवारांना पडू नये. त्यासाठी यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना किमान एक संधी देण्यात यावी, अशी मागणी पीडित उमेदवार कल्पना सोनटक्के आणि सलमान हनीफ शेख यांनी केली आहे.