नागपूर : शहरात पाण्याची गळती शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानामध्ये इतवारी येथील होलसेल क्लॉथ मार्केटजवळ वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला सापडला.  महापौर संदीप जोशी यांनी या जागेला भेट देऊन नाल्याच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिले.

गेल्या पंधरा  दिवसांपासून होलसेल कपडा बाजारपेठ जवळील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्यावर पाणी वाहत होते. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रार मिळताच ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी ओ.सी.डब्ल्यू. व जलप्रदाय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाण्याची गळती शोधण्याचा प्रयत्न केला. वारंवार गळती शोधूनही न सापडल्यानंतर रविवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यानंतरही पाणी वाहत असल्याने त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. खोदकामादरम्यान रस्त्याच्या सात फूट खाली नाला असल्याचे निदर्शनास आले. नाल्याचे स्लॅब तोडून नाल्यातील कचरा आणि माती काढण्यात आली. यावेळी १० मीटर अंतरावर नाल्याच्या स्लॅबच्या खाली १५ इंचची जुनी पाण्याची वाहिनी असून त्याखाली स्वयंचलित मशीनने टाकण्यात आलेल्या ऑप्टीकल फायबर केबलच्या पाईपमुळे सुमारे अडीच फुटाचा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. नाल्याची भिंत दगडाची असल्याने केबल टाकताना दगड कोसळले असावेत व दगड आणि पाईप यामुळे कचरा जमा होऊन हळूहळू नाला बुजला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.