सात लाखांचा साठा जप्त

सणासुदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात खाद्यतेलात भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मोठय़ा तेल व्यापाऱ्यांवर धाड टाकून सात लाख ९ हजार रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे. या तेलाचे नमुने पुढील तपासाकरीता प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.

काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून यावेळी फराळ आणि मिठाई तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खाद्य आणि वनस्पती तेलाची मागणी वाढते. याच काळात खाद्य तेलात भेसळ होण्याची दाट शक्यताही असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शहरातील ठोक तेल वितरकांकडे धाडी टाकल्या आणि तेलाचा साठा जप्त केला.

गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मस्कासाथ, इतवारी, चिखली लेआऊट येथील मेसर्स येनूरकर ट्रेडिग कंपनी, दिनेश ट्रेडिग कंपनी, जय गणेश ट्रेडर्स, मोतीयानी ब्रदर्स, उदय ट्रेडिग, महालक्ष्मी ट्रेडर्स, शक्ती ऑईल ट्रेडर्स, श्री शंकर ऑईल स्टोअर्स व किशनानी ट्रेडर्स कंपनीची सखोल तपासणी करून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल, शेंगदाणा तेल, ब्लेंडेड ईडिबल व्हेजिटेबल ऑईल, रिफाईन्ड पामोलिन ऑईल, मोहरी ऑईल, याशिवाय बेसन व मदा या अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये विविध कंपन्यांचा एकूण सात लाख ९ हजार १९३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात व सहायक आयुक्त शरद कोलते यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन, विनोद धवड, प्रफुल्ल टोपले, अनंत चौधरी, अमितकुमार उपलप, स्मिता बाभरे, पीयूष मानवटकर, किरण गेडाम यांनी केली. भेसळ होत असल्याचा संशय असल्यास ०७१२-२५६२२०४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले  आहे.