गडचिरोली : २०१० च्या दशकातला सशस्त्र नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता दिवंगत माल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याची पत्नी पोथुला पद्मावती उर्फ सुजाताने (६२) तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तेलंगणातील जोगुलांबा गाडवाल जिल्ह्यातील पेंचकलपेठ येथील रहिवासी असलेल्या सुजाताकडे नक्षल्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य, दक्षिण विभागाचे सचिवपद व दंडकारण्य विभागाच्या जनताना सरकारचा प्रभार होता. ४३ वर्षांपासून नक्षलसंघटनेत सक्रिय सुजातावर विविध राज्यात दोन कोटीहून अधिक बक्षीस होते.
शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सुजाताचे वडील पोस्टमन होते. चार भावंडांपैकी एक भाऊ हा १९८२ साली नक्षल चळवळीत सहभागी झाला. सोबतच तीन चुलत भावंड देखील नक्षल चळवळीत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. त्यामुळे प्रभावित झालेल्या सुजाताने बारावीत असतानाच नक्षल चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला.
सुरवातीला ग्रामप्रचारक, नाट्य मंडळीत काम करणाऱ्या सुजाताने १९८४ साली जहाल नक्षल नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजी सोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी आहे. त्यानंतर दोघांनाही १९८७ रोजी दंडकारण्य फॉरेस्ट कमिटी गडचिरोलीत पाठविण्यात आले. मुलीला नातेवाईकांकडे सुपूर्द करून दोघेही हिंसक चळवळीत सक्रिय झाले. १९८८ ते ८९ दरम्यान सुजाताने गडचिरोलीतील पेरमिली आणि एटापल्ली दलममध्ये उप कमांडर म्हणून काम केले. १९९६ साली तिला देवरी दलम कमांडर बनविण्यात आले.
१९९७ ते ९९ दरम्यान दक्षिण बस्तर विभागीय समिती सदस्य पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर दंडकारण्य विभाग आणि दक्षिण बस्तरमध्ये तिला महत्वाची जबाबदारी देण्यात आली. २००७ मध्ये दंडकारण्य झोनच्या जनताना सरकारचे प्रमुख पद तिच्याकडे सोपविण्यात आले. किशनजीला २००८ साली पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आल्यानंतर २०११ रोजी तो चकमकीत ठार झाला. त्यानंतर सुजाता संघटनेत अधिकच सक्रिय झाली. यामुळे तिला २०२२ साली केंद्रीय समितीवर घेण्यात आले. ती कोया भाषेतून निघणाऱ्या ‘पेथुरी’ मासिकाची संपादक देखील होती. गेल्या काही काळापासून आजारी असल्याने तिने मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निवडला.
६३ नागरिकांसह २०७ जवानांच्या हत्येत सहभागी
सुजाताला नक्षल चळवळीत महत्त्वाचे स्थान होते. ती सर्वोच्च महिला नेता होती. तिने आपल्या कार्यकाळात अनेक हिंसक घटना घडवून आणल्या. यात ६३ राजकीय व सामान्य नागरिकांसह २०७ जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. यात प्रामुख्याने ताडमेटला, गादीरास, झिरम घाटी, चिंतागुफा, कोरजगुडा, टेकुलगुडे येथे नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यांचा समावेश आहे. मधल्या काही काळापासून आजारी असल्यामुळे सुजाताने १३ सप्टेंबररोजी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या वर्षभरात तेलंगणामध्ये ४०४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.