स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून स्थानिक काँग्रेस नेते व सेना नेत्यांमध्ये जुपंली आहे. रोज परस्परांवर आरोप, प्रत्यारोप केले जात असून इशारेही दिले जात आहेत. स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देताना काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती, त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी प्रतिउत्तर दिले होते. त्यावर काँग्रेस नेते उमांकात अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन हरडे यांनी मर्यादेत राहून बोलावे, असा सल्ला दिला होता. शनिवारी पुन्हा सेनेचे डॉ. रामचरण दुबे आणि युवा सेनेचे नितीन तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निहोत्री यांच्यावर तोंडसुख घेतले. सेनेला अग्निहोत्री यांच्यासारख्या उपऱ्यांच्या उपदेशाची गरज नाही, असे ते म्हणाले.
अग्निहोत्री हे मूळचे शिवसैनिकच आहेत, त्यांनी आता काँग्रेससोबत घरठाव केला आहे, तेथे त्यांना कोणी विचारत नसल्यानेच ते नैराश्यापोटी शिवसेनेवर टीका करीत आहे, असे दुबे म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या झोपडपट्टी आघाडीचे संयोजक धरमकुमार पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. विलास मुत्तेमवार यांच्या विदर्भवादी असण्यावर सेनेने शंका घेऊ नये, त्यांच्या लढय़ाला झोपडपट्टी आघाडीचे संपूर्ण समर्थन आहे. शिवसेनेला विदर्भातील सर्व गोष्टी हव्या आहेत पण स्वतंत्र राज्य नको आहे हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress shiv sena leaders clash over separate vidarbha issue