|| महेश बोकडे

प्रदूषित शहरांत नाव येताच प्रदूषण मंडळाला जाग

देशातील प्रदूषित शहरांत नागपूरचे नाव येताच केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली आहे. त्यांनी मेडिकलसह शहरातील चार भागात वायु प्रदूषण मोजणारे स्वयंचलित यंत्र स्थापित करण्याचे प्रस्तावित केले असून काही जागांची मुंबईच्या चमूने पाहणीही केली आहे. हे यंत्र कार्यान्वित झाल्यास कुठेही प्रदूषणाची मात्रा वाढताच तातडीने उपाय केले जातील. दोन कोटींच्या या प्रकल्पामुळे शहरातील श्वसनासह इतर आजारांवरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात सध्या एक वायु प्रदूषण मोजणारे यंत्र आहे. दुसरे यंत्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) येथे असले तरी ते तांत्रिक कारणामुळे बंद आहे. येथे आवश्यक संख्येत वायु प्रदूषण मोजणारे यंत्र नसल्याने कोणत्या भागात किती प्रदूषण आहे, हे कळत नाही. त्यातच नागपूरचे नाव देशासह राज्यातील प्रदूषित शहरात आहे.

त्याला येथे सुरू असलेले रस्ते, मेट्रोसह इतरही विकासकामे  जबाबदार आहेत. या कामातून उडणाऱ्या धुळीमुळेही वायु प्रदूषण वाढून येथे श्वसनासह इतरही आजाराचे रुग्ण वाढल्याचे श्वसनरोग तज्ज्ञ सांगतात. या प्रदूषणाची गंभीर दखल केंद्रीय प्रदूषण मंडळाने (सीपीसीबी) घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मदतीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी), टाऊन हॉल, लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (एलआयटी)सह राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) येथे हे स्वयंचलित स्थापित करण्याचे प्रस्तावित केले आहे.

बाह्य़स्रोताकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रत्येक यंत्रासाठी सुमारे १५० ते २०० फुटांची जागा लागणार असून तेथे स्वयंचलित पद्धतीची यंत्रणा उभारली जाणार आहे. ती चालवण्यासाठी तेथे प्रत्येकी एक अभियांत्रिकी झालेला अधिकाऱ्यांसह सुरक्षेसाठी गार्ड नियुक्त केले जाणार आहे. ही नियुक्ती बाह्य़स्रोतांकडून केली जाणार आहे.

एका क्लिकवर माहिती

स्वयंचलित प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रणेला इंटरनेटच्या मदतीने थेट ‘एमबीसीबी’सह ‘सीपीसीबी’च्या सव्‍‌र्हरशी ऑनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून एका क्लिकवर संगणकावर नागपूरच्या वायु प्रदूषणाची स्थिती कळणार आहे.

‘‘शहरात जागा निश्चित होताच सीपीसीबीच्या मदतीने यंत्र लावले जाणार आहेत. त्यासाठी काही जागांची पाहणीही झाली आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कुठेही प्रदूषित हवा दिसताच त्यावर प्रशासनाला जास्त लक्ष देऊन उपाय करणे शक्य होईल.’’    – हेमा देशपांडे, उपविभागीय अधिकारी, एमपीसीपी.