संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
नागपूर : भारतातील पालींच्या जैवविविधतेत पालींच्या सहा नव्या प्रजातींची भर पडली आहे. पश्चिम घाटात सापडलेल्या प्रजाती ‘द्रविडोगेको’ पोटजातीतील नव्या प्रजाती आहेत. आजपर्यंत या पोटजातीतील केवळ एका प्रजातीचा भारतात अधिवास होता आणि तिचा शोध ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी लावला होता. त्यामुळे या नव्या पालींचा शोध भारतातील सरीसृपशास्त्रातील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा पश्चिम घाटाला देण्यात आला आहे. आतापर्यंत पश्चिम घाटातून अनेक पाली, सरडे, बेडकांच्या वैविध्यपूर्ण प्रजातींचा शोध लागला आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या ठिकाणाहून पालींच्या सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्यात सरीसृप संशोधकांना यश आले आहे. ‘द्रविडोगेको’ या पोटजातीत आजपर्यंत ‘द्रविडोगेको अन्नामलेइन्सिस’ या एकाच प्रजातीचे अस्तित्व होते. केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या या प्रजातीचा शोध १८७५ साली ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ अल्बर्ट गुन्थर यांनी लावला. या प्रजातींची वैविधता आणि उत्क्रांतीविषयक सखोल संशोधनास सरीसृप संशोधकांनी सुरुवात केली. या संशोधनादरम्यान त्यांना या सहा प्रजातींचा शोध लागला. २१ ऑक्टोबरला ‘झूटॅक्सा’ या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले. तामिळनाडू आणि केरळ राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटातून या सहा प्रजातींचा शोध लागला.
संशोधकांनी या सहाही पालींचे नामकरण केले. ‘द्रविडोगेको सेप्ट्रिओनिलिस’, द्रविडोगेको जानकीई(केरळातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जानकी अम्मल यांच्या सन्मानार्थ), द्रविडोगेको मेघामलाईन्सिस, द्रविडोगेको डग्लसअदम्सीस(ब्रिटिश लेखक डग्लस अदम्स यांच्या सन्मानार्थ) आणि द्रविडोगेको स्मिथी(ब्रिटिश उभयसृपशास्त्रज्ञ माल्क्रोम स्मिथ यांच्या सन्मानार्थ) असे त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. हे संशोधन बंगळुरूस्थित उभयसृपशास्त्रज्ञ आर. चैतन्य यांनी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचे संचालक डॉ. वरद गिरी, लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. दीपक विरप्पन, भूवनेश्वर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्चचे डॉ. अनिरुद्ध दत्त-रॉय, झुऑलॅजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डॉ. बी.एच.सी.के. मूर्ती आणि बंगलोर येथील द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे डॉ. प्रवीण कारंथ या सरीसृपशास्त्रज्ञांच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. या सहा प्रजातींची चाचणी आकारशास्त्र आणि गुणसूत्राच्या आधारे करण्यात आली आहे. पालींच्या या सहाही प्रजाती निशाचर असून त्या झाडांवर उत्तमप्रकारे चढू शकतात. झाडांच्या खोडावर त्यांचा अधिवास आढळतो. द्रविडोगेको ही भारतातील सर्वात जुन्या पालीची प्रजाती आहे.