देशाच्या पूवरेत्तर भागातले नागालँड हे राज्य व मध्य भारतातील भामरागड हे तालुक्याचे गाव, यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. अशा दोन ध्रुवावर असलेल्या भागांना जोडण्याचे काम काही व्यक्ती करत असतात. भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारे डॉ. आर.एल. जामी त्यातले एक होते. तीस वर्षांचा हा तरुण डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या दिवशी राज्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा गावाजवळील धबधब्यात बुडून मरण पावला. त्याच्या मृत्यूची बातमी गडचिरोलीच्या बाहेर सुद्धा जाऊ शकली नाही. प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स सेवा देण्यास अजिबात इच्छुक नसतात अशा भागांमध्ये गडचिरोलीचे नाव अजूनही अग्रक्रमावर आहे. जिथे कुणीही काम करायला तयार नाही, अशा नक्षलग्रस्त भागात सेवा देण्याचे धाडस डॉ. जामी यांनी दाखवले. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर शासनाने बंधनकारक केलेली ग्रामीण भागातील सेवा देण्यासाठी जामींनी थेट भामरागडची निवड केली. नुकताच एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या या डॉक्टरने नुकतेच आरोग्य संचालकांना विनंतीपत्र पाठवून आणखी वर्षभर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टर झालेले राज्यातलेच अनेक तरुण भामरागडला जायला तयार नसतात. प्रसंगी बंधपत्राच्या दहा लाखावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी असते. या पाश्र्वभूमीवर जामीचे वेगळेपण उठून दिसले. या वैद्यकीय अधिकाऱ्याने एका वर्षांच्या कालावधीत दुर्गम व मागास अशी ओळख असलेल्या भामरागड परिसरात एवढे नाव कमावले की त्याच्या मृत्यूनंतर भामरागड एक दिवस स्वयंस्फूर्तीने बंद राहिले. दुचाकीवर बसून गाव, पाडय़ात जाऊन रुग्ण तपासणाऱ्या या डॉक्टरचा मृतदेह भामरागडला आणला तेव्हा शेकडो आदिवासी रुग्णालयात त्याच्या अंत्यदर्शनासाठी वाट बघत होते. या भागातली आरोग्यसेवा स्वातंत्र्यापासून कायमची कोलमडलेलीच आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागात अनेक रुग्णालयात डॉक्टर्स नाहीत. काही ठिकाणी केवळ एक डॉक्टर चोवीस तास सेवा देतात. अजूनही अंधश्रद्धा व रूढी, परंपरांना कवटाळून बसलेले आदिवासी, रुग्णांना मांत्रिक व पुजाऱ्याकडेच नेतात. अशा प्रतिकूल वातावरणात आदिवासींचा विश्वास कमावणे सोपे काम नाही. डॉ. जामींनी ते केले. कारण ज्या प्रदेशातून ते आले, तोही असाच मागासलेला. अंतर फार असले म्हणून काय झाले, तिथे व येथे राहणारे आपलेच बांधव आहेत, असा विचार बाळगून मनापासून आरोग्यसेवा देणाऱ्या या डॉक्टरचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. केवळ चटका लावून हा मृत्यू थांबत नाही तर व्यवस्थेवर व त्यातील दोषांवर तो प्रश्नचिन्ह उभे करतो. डॉ. जामी यांचा मृतदेह केवळ नागपूपर्यंत पाठवण्यासाठी आरोग्य खात्याने अक्षम्य बेपर्वाई दाखवली. एक वाहन व एक चालक, सोबत कुणीही नाही अशा स्थितीत या डॉक्टरचे शव मेडिकलच्या शवागारात आणून टाकून देण्यात आले. या डॉक्टरचे वडील नागालँडवरून येतील व मृतदेह घेऊन जातील अशी भाषा खात्यातील अधिकाऱ्यांकडून वापरण्यात आली. नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेत सर्वत्र दोन प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात. त्यातली एक मनापासून काम करणारी, तर दुसरी कामचुकार म्हणून ओळखली जाणारी. या भागात या यंत्रणेला जाब विचारणारे कुणी नसते, त्यातून या कामचुकारांचे फावते. आरोग्य खात्यातील असेच कामचुकार आंबेडकर जयंतीच्या सुट्टीनिमित्त एकत्र आले व त्यांनी बिनागुंडाच्या धबधब्यावर एक पार्टी ठेवली. भामरागडहून जाताना त्यांनी डॉ. जामींना चलण्याचा आग्रह केला. हा डॉक्टर नाही म्हणत असताना त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. तिथे नेमके काय झाले ते कुणीही सांगायला तयार नाही. डॉक्टरच्या मृत्यूनंतर या पार्टीबाज अधिकाऱ्यांनी बिनागुंडय़ाला आरोग्य शिबीर ठेवले होते असा बनाव रचला व तसेच पोलिसांना सांगितले. पट्टीचे पोहणारे डॉ. जामी पाण्यात कसे काय बुडू शकतात, हा या भागातील आदिवासींसोबतच साऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिथे हजर असणारे द्यायला तयार नाहीच पण आरोग्य खात्याचे अधिकारी सुद्धा तोंडावर पट्टी बांधून बसलेले आहेत. घडलेल्या घटनेची चौकशी करायला पोलीसही तयार नाहीत व आरोग्य खात्याने या मृत्यूची फाईल बंद करण्याची तयारी चालवली आहे. हा सारा प्रकारच संतापजनक आहे. हाच प्रकार एखाद्या सधन व मोठय़ा शहरात राहणाऱ्या घरातील मुलाच्या बाबतीत घडला असता तर एवढी शांतता दिसली असती का, हा यातला कळीचा प्रश्न आहे. डॉ. जामी ज्या प्रदेशातून आले, त्या नागालँडचा आवाज सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कधी पोहचत नाही. जिथे ही घटना घडली ते बिनागुंडा तर दुर्लक्षित म्हणूनच ओळखले जाते. ज्या अशिक्षित व गरीब आदिवासींनी या डॉक्टरवर मनापासून प्रेम केले, त्यांचाही आवाज सत्ताकेंद्रापर्यंत पोहचू शकत नाही. हे वास्तव ठाऊक असल्यामुळेच साऱ्या सरकारी यंत्रणा शांत बसल्या आहेत. आजमितीला एक डॉक्टर तयार करण्यासाठी शासनाला ३५ लाख रुपये खर्च येतो. एवढा खर्च करूनही डॉक्टर जिथे गरज आहे तिथे सेवा देण्यास तयार नसतात. डॉ. जामी त्यापेक्षा वेगळे निघाले. त्यांनी जाणीवपूर्वक भामरागड निवडले. अशा स्थितीत त्यांचा मृत्यू होणे हे फारच क्लेशदायक आहे. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प सोडला तर भामरागड भागात आरोग्यसेवा देणारे दुसरे केंद्र नाही. तेथील सरकारी रुग्णालय कायम ओस पडलेले असते. अशा परिस्थितीत हजारो मैल अंतरावर राहणारा व नागपूरच्या मेयोत शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला तरुण भामरागडला जाण्याची हिंमत दाखवतो हेच प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्याला पार्टीच्या निमित्ताने का होईना पण वेगळ्या वाटेवर नेणाऱ्या आरोग्य खात्यातील बांडगुळांची चौकशी होणे गरजेचे आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी या जिल्ह्य़ात दरवर्षी कोटय़वधीचा निधी येतो. सरकारी यंत्रणेतील कामचुकार हा निधी कसा फस्त करता येईल याच काळजीत असतात. त्यातूनच हे मेजवान्याचे प्रकार घडतात. दुर्घटना कधीही, कुठेही घडू शकते हे खरे असले तरी निसरडी वाट का निवडली हा प्रश्न शिल्लक राहतोच. याही अंगाने या हळहळ वाटणाऱ्या मृत्यूवर विचार होणे गरजेचे आहे.
devendra.gawande@expressindia.com