वर्षभर वेतनाची उचलही
एकाने बनावट दस्तावेजाच्या आधारावर लष्करात भरती झाला व वर्षभरापासून तो वेतन उचलत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दस्तावेज पडताळणी दरम्यान आरोपीचा भंडाफोड झाला व त्याने लष्कराच्या हाती लागण्यापूर्वीच लष्करी छावणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार कामठी लष्करी छावणी परिसरात उघडकीस आला.
या घटनेने लष्करात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज दिनेश सालोदरी (२१) रा. भदरोली, उत्तरप्रदेश असे ठगबाजाने आपले नाव सांगितले होते. २०१८ मध्ये दिल्ली लष्करी मंडळाकडून शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
यावेळी आरोपीने दस्तावेज सादर करून भरती दिली. त्यात त्याची निवड झाली. काही दिवस दिल्लीत प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढील प्रशिक्षणासाठी कामठीतील लष्करी छावणीत पाठवण्यात आले. या ठिकाणी ओसीजीए ट्रेनिंग समूहात तो प्रशिक्षण घेत होता.
यादरम्यान दिल्ली लष्करी मंडळाने त्याच्या दस्तावेजाची पडताळणी केली असता आरोपीने सादर केलेल्या दस्तावेजावरील व्यक्ती हा आपल्या घरी सापडला व त्याने कोणत्याही प्रकारची लष्करी भरती दिली नव्हती, असे स्पष्ट झाले.
दिल्ली मंडळाने नागपूरला कळवले. याची चाहूल आरोपीला लागली होती. त्यामुळे ३० सप्टेंबरला दुपारी २ वाजता तो लष्करी छावणी सोडून पळून गेला. याप्रकरणी लष्करी अधिकारी सूरजभान मानसिंग (४२) रा. लाडवा, कुरुक्षेत्र यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यातील हवालदार पाली यांनी गुन्हा दाखल केला आहे.
हरवलेल्या दस्तावेजांचा गैरवापर
आरोपीने सादर केलेले दस्तावेज दुसऱ्या व्यक्तीचे असून त्याचे ते दस्तावेज हरवले होते. ते दस्तावेज आरोपीला सापडले. त्या दस्तावेजांचा गैरवापर करून आरोपीने लष्करात नोकरी मिळवून घेतली.