नागपूर : ओडिशातील हत्तींनी थेट ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात प्रवेश केल्याने ताडोबा सफारीवर अनिश्चीततेचे सावट होते. ऐन पर्यटनाच्या रस्त्यावर हत्ती आलेत तर काय? असा प्रश्नही ताडोबा प्रशासनाला पडला होता. मात्र, आता ओडिशातून आलेल्या हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघरप्रकल्पातून काढता पाय घेतला आहे आणि आपला मोर्चा त्यांनी पोंभुर्णा गावाच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे ताडोबा प्रशासनासोबतच पर्यटक आणि लगतच्या गावकऱ्यांनी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे.

ओडिशातून दाखल झालेल्या दोन हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्रवेश करून चांगलीच खळबळ माजवली होती. पर्यटकांना त्यांचा धोका लक्षात घेता जंगल सफारी सुरू ठेवायची की नाही? असा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी या हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची हद्द पार करत पोंभुर्णा जंगलाच्या दिशेने कूच केल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. हे हत्ती रेल्वे मार्ग ओलांडून चीचपल्ली मार्गे तिकडे रवाना झाले. ताडोबात पर्यटन हंगामाची ही अखेर आहे.

पावसाळ्यात गाभा क्षेत्रात पर्यटन बंद असल्याने आता पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र ताडोबाच्या परिसरात हत्ती दाखल झाल्याने या पर्यटनावर धोक्याचे सावट निर्माण झाले. दोन हत्ती ताडोबात दाखल झाले. अशावेळी ही सफारी सुरू ठेवायची की नाही? याबाबतचा मोठा प्रश्न ताडोबा व्यवस्थापनासमोर उभा ठाकला होता. मात्र, सोमवारी हत्तींनी व्याघरप्रकल्प सोडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. कारण या दोन्ही हत्तींनी ताडोबाचे क्षेत्र सोडत पोंभुर्णा येथील प्रादेशिक जंगल गाठले आहे. हे हत्ती येथील वैनगंगा नदी ओलांडून तेलंगणा राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता आहे.

हत्ती ताडोबात दाखल झाल्यापासून त्यांच्यावर कटाक्षाने देखरेख सुरू होती. या हत्तींमुळे सफारी करण्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी दक्षता बाळगली जात होती. ज्या ठिकाणी हत्तींचा वावर आहे तो मार्ग सोडून इतर मार्गाने ही सफारी करण्याचे नियोजन होते. तसेच गावकऱ्यांना त्रास होऊ नये याचीदेखील काळजी घेतली जात होती. हत्ती सध्या पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात दाखल झाले आहेत.

त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी वनपरिक्षेत्र स्तरावर असलेले पथक आणि शीघ्र कृती दल यांची नेमणूक करण्यात आली आहे. हत्ती हे सध्या पोंभुर्णा या परिसरात असले तरी त्यांचे सर्व संभाव्य नियोजन करण्यात येत आहे. हे हत्ती पुढे जाऊन तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जंगलात प्रवेश करू शकतात. मात्र, ते चंद्रपुर जिल्ह्यात असल्यास देखील कुठलीही अप्रिय घटना घडू नये यादृष्टीने ताडोबा प्रशासन काळजी घेत आहे.