वनखात्याच्या समितीचा निर्णय

पेंच व्याघ्र प्रकल्पात खुल्या पिंजऱ्यातील दोन्ही वाघिणींच्या सुटकेचे प्रयत्न निर्थक ठरले आणि त्यांच्या नशिबी कायमचा बंदिवास आला. हीच परिस्थिती भविष्यात इतरही वाघांच्या अनाथ बछडय़ांबाबत उद्भवू नये म्हणून वनखात्याने स्थापित केलेल्या समितीच्या शुक्रवारी नागपुरात झालेल्या पहिल्या बैठकीत मानक कार्यपध्दती (एसओपी-स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम) तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मध्य चांदा वनविभागात ७ वषार्ंपूर्वी वाघिणीची शिकार झाल्यामुळे एक नर व दोन मादी बछडय़ांना संगोपनासाठी नागपुरात आणले. या तिन्ही बछडय़ांची सुरुवातीला बोर अभयारण्यात आणि नंतर ते मोठे झाल्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पात खुला पिंजरा तयार करून तेथे रवानगी करण्यात आली. बछडय़ांना जंगलात सोडण्याच्या दृष्टीनेच त्यांना मानवी सहवासापासून दूर ठेवून शिकारीचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, त्यांना जंगलात सोडण्याच्या प्रयोगाला वनखाते घाबरले. सहा वर्षांंनंतर या प्रयोगाला वनाधिकारी कसेबसे तयार झाले, पण त्यांची नकारात्मक मानसिकता आडवी आली आणि प्रयोग अयशस्वी झाला. यातील नर वाघाला आधीच प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले, तर दोन वाघिणींनाही आता मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाणार आहे.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मोईपोकिन अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए.डी. खोलकुटे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दक्षिणकर, विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ट, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक  शुक्रवारी वनविभागाच्या कार्यालयात पार पडली.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने (एनटीसीए) जारी केलेल्या विषयांवरील एसओपीची प्रत सदस्यांना देण्यात आली. वाघिणीचे अस्तित्व आढळले नाही, तर अनाथ बछडय़ांना कुठे ठेवायचे, त्यांना जंगलात मुक्त करण्यासाठी काय प्रशिक्षण द्यायचे, प्राणिसंग्रहालयात ठेवायचे का, या सर्व मुद्यांवर आधारित एसओपी तयार करण्यासंदर्भात समितीच्या सदस्यांना निर्देश देण्यात आले. येत्या आठवडाभरात समितीचे सदस्य त्यांचा अहवाल सादर करून त्या आधारावर येत्या महिनाभरात एसओपी तयार करण्यात येणार आहे.