मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध? अधिकाऱ्यांची मूकसंमती; पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

prisoner attacks Prison superintendent in Kolhapur Kalamba jail
संग्रहित छायाचित्र

अनिल कांबळे, लोकसत्ता 

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून कैद्यांमध्ये दोन गट पडले आहेत. यातून  टोळीयुद्ध पेटले असून काही कैद्यांच्या कृत्याला कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच मूकसंमती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मध्यवर्ती कारागृहात जवळपास अडीच हजार शिक्षाधीन आणि न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. कारागृहाच्या आत सामान्य व्यक्ती, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य कोणत्याही विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विनापरवानगी प्रवेश नसतो. त्यामुळे कारागृहातील कोणत्याही अनैतिक कृत्याची माहिती बाहेर येत नाही. त्यावर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे कारागृहात ‘अधिकारी म्हणेल तो कायदा,’ या नियमानुसार कैदी आणि कर्मचाऱ्यांना वागणूक दिली जाते. अधिकाऱ्यांविरोधात जाणाऱ्या कैदी किंवा तुरुंग कर्मचाऱ्याचा योग्य तो बंदोबस्त केला जातो.   कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. कारागृहात अनेक कुख्यात आणि धनाढय़ कैदी आहेत. संतोष आंबेकर, राजू भद्रे, रणजीत सफेलकर यासारखे टोळीप्रमुखसुद्धा कारागृहात बंदिस्त आहेत. अशा वजनदार कैद्यांकडून पैसे घेऊन त्यांना ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ दिली जाते. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या कैद्यांना वेगवेगळय़ा सोयी सुविधाही पुरवल्या जात असल्याची माहिती आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महिला कर्मचारी त्रस्त

कारागृह अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतात. वरिष्ठांचा आशीर्वाद असलेली महिला अधिकारी तुरुंगरक्षकांना हीन दर्जाची आणि अपमानास्पद वागणूक देते. महिला कैद्यांना सुविधा पुरवल्याची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून महिला रक्षकांना निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जातात, असे एका महिला कर्मचाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

अधिकारीच पुरवतात सेवा?

कारागृहात प्रवेश करताना प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रवेशद्वारावरच अंगझडती घेतली जाते. परंतु, अधिकाऱ्यांची अंगझडती घेण्यात येत नाही. त्यामुळे कैद्यांना मोबाईल, गांजा, दारू, ड्रग्ज, हॉटेलमधील चमचमीत खाद्यपदार्थ आणि अन्य सोयीच्या वस्तू कर्मचारी नव्हे तर अधिकारीच पुरवत असल्याचा दावा एका कर्मचाऱ्याने केला.

चित्रफितीमुळे खळबळ

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी अशोक पल्लेवार यांची एक चित्रफित नुकतीच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पल्लेवार यांनी कारागृह अधीक्षकांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. कारागृहातील बांधकाम घोटाळा आणि कैद्यांना पैसे घेऊन पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी कशाप्रकारे मानसिक व शारीरिक त्रास देतात, याचा उल्लेखही पल्लेवार यांनी केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang war in central jail in maharashtra prisons in nagpur jail zws

Next Story
तारखा जाहीर, परीक्षा पद्धतीचा निर्णय मात्र नाहीच
फोटो गॅलरी