* ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साठवणूक
* कीडींचा प्रादुर्भाव, उंदीर-घुशींमुळे नासधूस
धान्य साठवणीसाठी आज बरीच खबरदारी घेतली जात असली तरी कीटक, बुरशी, उंदीर-घुशी यांचा प्रादुर्भाव, आद्र्रता, अयोग्य पद्धतीने होणारी धान्याची हाताळणी आणि साठवणुकीसाठी योग्य साधनांच्या अभावामुळे राज्यात सुमारे ३०० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या धान्याची दरवर्षी नासाडी होत आहे.
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे सुमारे १२ टक्के धान्याची नासाडी होत असल्याचे आढळून आले आहे. देशात धान्यावर प्रामुख्याने ४० प्रकारच्या, तर राज्यात १२ प्रकारच्या कीडी आढतात. यात प्रामुख्याने सोंडे, विविध प्रजातीचे भुंगेश, पतंग, अळ्या, टोके, सुरसे यांचा समावेश आहे. कीड धान्य खाण्यासाठी त्याचा भुगा करतात. भुंगेरे धान्याचा बीजकोश खातात, असे धान्य पेरणीसाठी उपयोग पडत नाही. या कीडींच्या प्रादुर्भावामुळे साठविलेल्या धान्यातील तापमान वाढते. त्यातील अंगभूत ओलावा संपतो आणि त्यावर बुरशी वाढते. त्यामुळे धान्य कुजते आणि खाण्यासाठी निरुपयोगी ठरते. साठवणीत धान्याची योग्य काळजी न घेतल्यास उंदीर-घुशी, खारी यासारखे कुरतडणारे प्राणी धान्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी करतात. साठवणुकीच्या चुकीच्या पद्धतीमुळे राज्यात सुमारे ३०० कोटींपेक्षा अधिक किमतीचे धान्य दरवर्षी खराब होत असल्याचे आढळून आले आहे.
पेव अर्थात, जमिनीखाली धान्य साठविण्यासाठी बांधलेल्या जागा आता अस्तित्वात राहिलेल्या नसल्या तरी ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने धान्याची साठवणूक केली जाते. विशेषत: कणगीचा वापर अधिक होतो. कणगीतील धान्यास कीड व बुरशी सहज लागून नुकसान होते. पत्र्याचे पिंप, टाक्या, कोठय़ा, तागापासून बनविलेल्या पोत्यांचाही वापर होतो. पारंपरिक धान्य साठवणूक पद्धतीमुळे धान्यातील आद्र्रतेचे प्रमाण योग्य राखले जात नसल्याने त्याची गुणवत्ता कमी होते आणि धान्यात बुरशी होऊन नासाडी होते.
धान्याची शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्यासाठी केंद्रीय अन्न तंत्रविद्याविषयक संसोधन संस्था व भारतीय धान्य साठवण केंद्र, केंद्रीय वखार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून कीड नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
धान्य चांगले वाळवून आद्र्रतेचे प्रमाण कमी करणे, गोदामे स्वच्छ, कोरडी, हवेशीर असावी, धान्य साठवण्यापूर्वी पोती, कणग्या, गोदामे यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी करणे, असे उपायही धान्याच्या सुरक्षित साठवणीसाठी सूचविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध उपाययोजना -कुमार
कीड, पाऊस, आग आदी कारणांमुळे धान्याची नासाडी होऊ नये म्हणून भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) नागपूर कार्यालयाने विशेष काळजी घेतली आहे. पावसाळ्यात धान्याची नासाडी होऊ नये म्हणून ‘मान्सून पूर्व उपाययोजना’ आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. दर्जा नियंत्रणावर विशेष लक्ष दिले जात आहे. गोदामात कीड प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाते. गोदामांमध्ये कीटकनाशक गोळ्या टाकण्यात येतात. गॅस प्रूप कव्हर टाकून एक आठवडय़ांपर्यंत माल सील केला जातो, असे  ‘एफसीआय’चे क्षेत्रीय व्यवस्थापक मृत्यूंजय कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

धान्याची नासाडी नाही -वंजारी
भारतीय खाद्य महामंडळाच्या नागपूर प्रादेशिक मुख्यालयातून पुरवठा होत असलेल्या धान्याचे जिल्ह्य़ात स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरण केले जाते. हे धान्य ५० किलोच्या थैल्यांमधून येत असून नासाडी होण्याचा प्रश्नच नाही. वाहतुकीत होणारी तूट संबंधित कंत्राटदारांकडून वसूल केली जाते. धान्याची नासाडी होऊ नये, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी गोदामांची देखरेख करणाऱ्यांची असते, असे नागपूर जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grain dilapidation continues in maharashtra