१०८ कोटींचा कर बुडवला
नागपूर : केवळ कागदोपत्री व्यवसाय दाखवून बनावट पावत्यांच्या आधारे इनपुट क्रेडिट टॅक्स उकळून जीएसटी (वस्तू व सेवा कर) चोरी प्रकरणी शुक्रवारी तीन व्यावसायिकांना वस्तू व सेवा कर गुप्तचर विभागाने अटक केली. वस्तू व सेवाकर विभागाकडून तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून त्यांच्या बाबा इंटरप्राईजेसचे रामप्रसाद बोरकर,भवानी एंटरप्राईजेसचे मोहम्मद शमशाद शेख व करण स्टीलचे मालक नेहर बोपचे यांना अटक करण्यात आली.
येथील जीएसटी विभागाला मिळालेल्या महितीनुसार तिन्ही कंपन्यांचे संचालक बनावट पावत्या तयार करून कोटय़वधींचा व्यवसाय केवळ कागदोपत्री दाखवून बँकेची पत (कर्ज) उचलायचे. यामुळे शासनाचा कोटय़वधींचा महसूल बुडत होता. मात्र व्यवसायात अचानक आलेल्या तेजीमुळे जीएसटी गुप्तचर विभागाने याच्या व्यवसायाच्या उलाढालीची बरकाईने तपासणी सुरू केली. यात तिन्ही कंपन्यांचा कोणताच व्यवसाय नसल्याचे समोर आले. बनावट पावत्या सादर करून इनपूट क्रेडिट टॅक्स लाटण्याचे हे प्रकरण आहे. यामध्ये तिन्ही कंपन्यांनी मिळून १०८ कोटींचा जीएसटी चोरी केल्याचे उघड झाले आहे. या तिन्ही कंपन्यांनी १०८ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट इनव्हाइस सादर केले. याद्वारे तब्बल ९.७५ कोटी रुपयांचा इनपुट क्रेडिट टॅक्स उकळण्यात आला. त्यामुळे जीएसटी गुप्तचर विभागाने ५ आणि ६ फेबुवारीला या तिन्ही व्यवसायिकांच्या प्रतिष्ठानांवर छापा टाकून त्यांच्या तीन संचालकांना अटक केली. शिवाय यामध्ये अणखी दोन व्यावसायिक असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. यामध्ये कुश ट्रेडर्सचे राम जांगीड आणि साईकृपा एंटरप्राईजेसचे हर्षल रामटेके यांचा समावेश असल्याचे जीएसटी विभागाने कळवले आहे.