नागपूर : नरखेड वनपरिक्षेत्रातील बानोर नियतक्षेत्राअंतर्गत थडीपवनी ते बानोर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात पाहणी करून त्यांनी पंचनामा नोंदवला. मृत बिबट्या अंदाजे नऊ ते बारा महिन्यांचा आहे. बिबट्याचा बछडा नाल्याच्या पाण्यात बुडालेला होता आणि त्याचे शरीर फु गलेले होते. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.  मृत बिबट्याचे मुंडके  हे शरीरापासून १०० मीटर अंतरावर आढळून आल्याने शिकारीचीही शक्यता नाकारता येत नाही. घटनेची माहिती नागपूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांना देण्यात आली. या प्रकरणात वनगुन्हा नोंदवण्यात आला असून काटोल उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पी.डी. पालवे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात पशुधन विकास अधिकारी कविता साखरे, केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर काटे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.