दुकानदार, भाजी विक्रेत्यांचा नव्या नियमाला प्रतिसाद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. मंगळवारपासून ते लागू करण्यात आले. पहिल्याच दिवशी याला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. दुपारची गर्दी आता सकाळी ११ वाजेपर्यंतच होत असल्याचे दिसून आले.

नव्या नियमानुसार  सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. पूर्वी

त्यांना आठ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी होती. वेळ कमी के ल्याने नागरिकांनी सकाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. अकरा वाजतानंतर दुकाने बंद झाल्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

सोमवारी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत केवळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह भाजी बाजार सुरू ठेवता येणार आहे. भाजीबाजारात मात्र पोलिसांच्या गाडय़ा साडेदहापासून फिरत असल्याने साडेअकराच्या दरम्यान शहरातील सर्व भाजीबाजार बंद करण्यात यश आले.

दुकानदार आणि भाजीविक्रेत्यांना देखील करोना संकटाची जाणीव आहे. परिणामी, त्यांनी  टाळेबंदीला चांगला प्रतिसाद दिला. दुपारी बारा वाजल्यानंतर शहरात एकाकी संचारबंदीचे खरे चित्र दिसून आले. केवळ रुग्णवाहिका आणि आवश्यक सेवेसाठीच नागरिक रस्त्यावर दिसले. मात्र बहुतांश भागातील रस्ते रिकामे बघायला मिळाले.

बुधवारी बाजार, कॉटन मार्केट, कळमना मार्केट, संत्रा मार्केट, सक्करदरा बाजार, खामला बाजार, इतवारी, महाल, धरमपेठ भाजीबाजार, सदर भाजीबाजारासह इतर सर्व ठिकाणी बारानंतर शुकशुकाट दिसून आला. विशेष म्हणजे, पोलिसांची गाडी फिरल्यानंतर आणि त्यांनी दुकाने बंद करण्याचे सांगताच अवघ्या काही मिनिटातच फळभाजी विक्रेते आणि दुकानदारांनी प्रतिसाद देत आपले प्रतिष्ठाने बंद केलीत.

कडक टाळेबंदीची आमची मागणी होती. आम्ही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेटून सर्व बाजारपेठांसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील काही मर्यादित काळानंतर बंद ठेवावी यासाठी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.आज आमची मागणी मान्य झाली आहे. नागपूरकर देखील याला चांगला प्रतिसाद देत असून आता करोनाची साखळी शंभर टक्के तुटेल असा आम्हाला विश्वास आहे.

– अश्विन मेहाडिया, अध्यक्ष नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्स.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown rules tightened to prevent corona infection zws