भ्रमणध्वनी मनोऱ्यामधून निघणारी चुंबकीय विकिरणे चिमण्यांसाठी घातक ठरत असल्याचे आजपर्यंत बोलले जात होते. मात्र, नव्या अभ्यासानुसार चिमण्याच नव्हे, तर ही चुंबकीय विकिरणे, तसेच वायरलेस उपकरणांमुळेसुद्धा मानव आणि सजीवांवर अतिशय वाईट परिणाम होत आहे. जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन पर्यावरण संघटना आणि खासगी संशोधन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

आंतरराष्ट्रीय विकिरण संरक्षण संस्थेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागामार्फत संशोधन करून चुंबकीय विकिरणांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून विविध प्रतीच्या उत्सर्जनामुळे शरीराचे तापमान वाढते, हे सिद्ध केले. चुंबकीय विकिरणांच्या सतत संपर्कात राहिल्यास आरोग्यास धोका होत असल्याचा निष्कर्ष काढून नवीन नियम लागू केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने १४ देशांमधील ३१ वैज्ञानिक आणि डॉक्टरांसह अभ्यास करून चुंबकीय विकिरणांच्या सततच्या कमीअधिक संपर्कामुळे विविध अवयवांचा कर्करोग, विसराळूपणा, डोकेदुखी, निद्रानाश, संसर्ग, रक्तदाब, अर्ध डोकेदुखी, मानसिक आजार होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच भारतासह इतरही अनेक देशांनी या टॉवरमधून निघणाऱ्या अत्याधिक उत्सर्जनावर र्निबध घातला आहे. काही भारतीय संशोधकांच्या मते त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही. मात्र, सरकारी व खासगी संस्थांनी केलेल्या संशोधात अत्याधिक उत्सर्जनाचे दुष्परिणाम समोर आले आहेत.

भ्रमणध्वनी मनोऱ्यासोबतच भ्रमणध्वनीसारख्या वायरलेस उपकरणांमधूनही चुंबकीय विकिरणे बाहेर पडत असून त्याचाही आरोग्यावर, विशेषत: भ्रमणध्वनीचा डोळ्यांवर अधिक परिणाम होत आहे. वायफाय, ब्ल्यू टूथ, ब्रॉडबँड इंटरनेट, भ्रमणध्वनी संच, फोर-जी तंत्रज्ञान यासारख्या सर्व वायरलेस उपकरणांमध्ये चुंबकीय विकिरणांचा वापर होतो. त्याचा अतिवापर हा लहान मुले, गर्भवतींसह ज्येष्ठांसाठीसुद्धा धोकादायक आहे. फोर-जी तंत्रज्ञानाचे उदाहरण घेतल्यास यात १०० मेगाबाईट ते १ गिगाबाईट इतकी उच्च ऊर्जा असलेली विकिरणे वापरण्यात येतात. त्यामुळे ती मानवी मेंदू व मज्जासंस्थेला धोकादायक आहे. मानवी मेंदू कमी कंपनाच्या लहरी तयार करतात आणि ग्रहण करतात. मानवी शरीरसुद्धा विद्युत तरंगावर कार्य करते, पण तीव्र ऊर्जा उत्सर्जित करणारे विकिरण शारीरिक कार्यात अडथळे निर्माण करतात. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने भ्रमणध्वनी टॉवर उभारण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, भ्रमणध्वनी कंपन्यांकडून त्या धुडकावून लावल्या जात असल्याने त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत.