नीरीच्या अभ्यासातील निष्कर्ष; वायुप्रदूषणामुळेही ३ हजार ६२२ कोटी रुपयांचा फटका

नागनदी स्वच्छतेवर गेल्या सहा वर्षांत महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च केले. मात्र नदी स्वच्छ होणे दूरच, पण त्यात मिसळलेले सांडपाणी कमी करण्यातदेखील पालिकेला यश आले नाही. यामुळे महापालिकेने ११६ कोटी रुपयांचे नुकसान करून घेतले, असा निष्कर्ष नीरीच्या संशोधकांनी ‘अवॉयडेड कॉस्ट मेथड’(टाळता येणाऱ्या खर्चाची पद्धती) वापरून केलेल्या गणनेत काढला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशावरून महापालिकेने नीरी आणि आयआयटीला प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या अहवालात उपाययोजनाही सुचवण्यास सांगण्यात आले. हा अहवाल नीरीने चार दिवसांपूर्वी महापालिकेला सोपवला. त्यात वाढत्या वायुप्रदूषणामुळे तीन हजार ६२२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. अहवालात वायुप्रदूषणावर अधिक भर असला तरीही शहरातील जलप्रदूषणाची स्थितीही तेवढीच वाईट आहे. तसेच शहरातील बांधकामाचा वाढता आलेख वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. हेच बांधकाम व मलवाहिन्या नद्यांच्या प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचे अहवालात सांगितले आहे. नीरीने यावर्षी नागनदीचा अभ्यास केला. त्यात स्वच्छता तर दूरच राहिली, पण प्रदूषण कमी करण्यातही महापालिका प्रशासनाला यश आले नाही. नीरीने ‘अवायडेड कॉस्ट मेथड’ पद्धतीचा त्यासाठी वापर केला. नागनदीतील सांडपाण्याचे प्रमाण किती आणि त्यापैकी किती पाण्यावर प्रक्रिया करता येऊ शकत होती, याचा अभ्यास केला. या अभ्यासात पाण्यातील ‘बीओडी’चे प्रमाण (जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी) आणि ‘सीओडी’चे प्रमाण (रासायनिक ऑक्सिजन मागणी) मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे आढळून आले. पाण्यातील या घटकाचे प्रमाण ठरलेले असते. ठरलेल्या मानकापेक्षा ते अधिक असेल तर ते पाणी प्रदूषित समजले जाते. नीरीच्या संशोधकांनी त्या मानकापर्यंत पोहोचण्यासाठी किती पैसे खर्च झाले, याचा अंदाज घेतला

असता ती किंमत ११६ कोटी रुपये निघाली. म्हणजेच पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून महापालिकेने काळजी घेतली असती, तर हे ११६ कोटी रुपये वाचवता येऊ शकले असते. ही किंमत फक्त नुकसानीची होती. नदीचे पर्यावरण वाचवण्यासाठी त्यात अधिक खर्च होणार आहे. नीरी पुढील वर्षी शहरातील इतरही नद्यांचा अभ्यास करणार आहेत.

सहा वर्षांपासून काम सुरू

२०१३ पासून महापालिकेने नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २०१६ साली केंद्राने एक हजार २५२.३३ कोटी रुपयाच्या निधीस तत्त्वत: मान्यता दिली होती. गेल्या तीन वर्षांत हा प्रकल्प ९५७ कोटी रुपयांनी वाढला आहे. आता या प्रकल्पाची किंमत दोन हजार ४३४ कोटी रुपये इतकी झाली आहे. इतका खर्च करूनही शहरातील नद्या स्वच्छ तर झाल्याच नाही, पण नद्यांचे प्रदूषण दूर करण्यातही महापालिकेला अपयश आले.

जलप्रदूषणाकरिता उपलब्ध माहितीच्या आधारावर आम्ही केवळ नागनदीचा अभ्यास केला. ‘अवाईडेड कॉस्ट मेथड’ वापरून गणना केली असता नदी प्रदूषणामुळे ११६ कोटी रुपयांचे नुकसान समोर आले. हे प्रदूषण होऊच दिले नसते तर ११६ कोटी रुपये वाचवता येऊ शकले असते. आता तर प्रदूषण दूर करण्यासोबतच त्याच्या पुनरुज्जीवनासाठी देखील अधिकचा खर्च येणार आहे. – हेमंत भेरवानी, संशोधक, नीरी