नागपूर: महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतांनाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एन् सनासुदीत एसटीचे प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीसह इतर सन साजरे करण्यासाठी एसटीने जाण्यास इच्छुक असलेल्यांना जास्त पैसा मोजावा लागणार आहे. एसटीच्या १५ ऑक्टोंबरपासून जाहिर केलेल्या भाडेवाढीबाबत आपण जाणून घेऊ या.

एसटी महामंडळाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दिवाळी गर्दीच्या हंगामात परिवर्तनशील भाडे आकारणेबाबत सगळ्या प्रादेशिक व्यवस्थापकांसह विभाग नियंत्रकांना आदेश दिले गेले आहे. दरम्यान एसटी महामंडळाकडून यापूर्वी २५ जानेवारी २०२५ पासून डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमती वाढल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार भाडेवाढ केली गेली होती. परंतु आता पून्हा दिवाळीत भाडेवाढीमुळे प्रवासाचा बेत रचलेल्यांवर नाहक भुर्दंड पडणार आहे. नवीन भाडेवाढ ही १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यानच्या सनासुदीच्या काळात राहणार आहे. त्यानंतर पून्हा दर कमी होणार असल्याचा एसटी महामंडळाचा दावा आहे.

एसटी महामंडळाच्या नवीन परिपत्रकानुसार १५ ऑक्टोंबरपासून एसटीच्या साधी (साधी मिडी), जलद, निमआराम, साधी शयनआसनी, साधी शयनयान, वातानुकुलीत शिवशाही (आसनी), वातानुकुलीत जनशिवनेरी (आसनी)च्या प्रवास भाड्यात १० टक्के भाडे वाढ केली जाणार आहे. त्यामुळे साधी (साधी मिडी)चे प्रवास भाडे प्रति टप्पा (प्रति सहा किलोमिटर) १०.०५ रुपये एवजी वाढून १२ रुपये असेल. तर लहान मुलांचे भाडे प्रति टप्पा ७ रुपये असेल. जलद बसचे भाडे १०.०५ रुपये प्रति टप्यावरून १२ रुपये तर मुलांचे भाडे ७ रुपये असेल. निमआरामचे भाडे १३.६५ रुपये प्रति टप्पा एवजी १५ रुपये असेल. तर मुलांचे भाडे ९ रुपये असेल. साधी शयनयानचे भाडे १४.७५ रुपये प्रति टप्यावरून १७ रुपये तर मुलांचे भाडे ९ रुपये असेल. वातानुकुलीत शिवशाही (आसनी)चे भाडे १४.२० रुपये प्रति टप्या एवजी १७ रुपये तर वातानुकुलीत जशिवनेरी (आसनी)चे दर १४.९० रुपयेवरून १८ रुपये केले गेले असल्याचेही महामंडळाने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

वातानुकुलीत शिवनेरी, ई- बस, शिवाईतील प्रवाशांना दिलासा…

एसटी महामंडळाने वातानुकुलीत शिवनेरी (आसनी), ९ मीटर ई- बस, वातानुकुलीत शिवाई (आसनी) १२ मीटर शिवायी या बसेसमध्ये मात्र सनासुदीत भाडेवाढ न करण्याचे शरवले आहे. त्यामुळे यातून प्रवास करणाऱ्यांना जुन्या दरानुसार म्हणजे वातानुकुलीत शिवनेरीसाठी (आसनी) २१.२५ रुपये प्रति टप्पा (प्रति सहा किमी), ९ मीटर ई- बससाठी १३.८० रुपये, वातानुकुलीत शिवाई (आसनी) अथवा १२ मीटर ई- बससाठी १५.१५ रुपये असेल असेही महामंडळाने कळवले आहे.