करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने विविध प्राण्यांपासून नव्याने उद्भवणाऱ्या आजारांची साखळी तोडण्यासाठी लवचीक निरीक्षण प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
नीती आयोगाने नुकतीच ‘व्हिजन २०३५: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ ही श्वेतपत्रिका जारी केली असून त्यात वरील बाब नमूद करण्यात आली आहे. संपूर्ण जग हे सध्या करोना साथरोगाने त्रस्त आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लस येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या या श्वेतपत्रिकेत प्राण्यांपासून उगम पावणाऱ्या आजारांचा नव्याने अभ्यास करणे व अशा आजारांची साखळी तोडण्यासाठी निरीक्षण प्रणाली निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी मानव आणि प्राणी यांच्यातील व्यवहारांचे स्वरूप लवकर निश्चित होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
श्वेतपत्रिकेत चार महत्त्वाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. त्यात भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी करणे, आरोग्य सेवेत नागरिकांच्या अभिप्रायाची सोय करणे, आजारांचे निदान, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील माहितीची आदानप्रदान प्रणाली अधिक सुधारित करणे आदींचा समावेश आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद के. पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सर्वाल यांनी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे.