नागपूर येथील बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलाखाली एक महिला व एका पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केला असता कौटुंबिक बदनामीच्या रागातून सख्ख्या भावांनीच इतर दोघांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघडकीस आले.
राहुल बोडखे (२७), खुशाल बोडखे (२९), विजय बोडखे (३०), आकाश राऊत (२४) अशी चारही आरोपींची नावे आहेत. उत्तम बोडखे (३१) रा. बिहाडी, कारंजा घाडगे आणि सविता गोवर्धन परमार (३८) असे खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तम आणि सविता दोघांचेही प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित होते. या प्रकारावरून बोडखे कुटुंबाची बदनामी होत होती. उत्तम आणि सविता एकत्र राहत असल्याने इतर दोन्ही भावाचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे हा सर्व राग मनात धरून राहुल बोडखे, खुशाल बोडखे या दोन्ही सख्ख्या भावांनी इतर दोघांना सोबत घेत कट रचला.
जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालाच्या खुनाची ३० लाखांची सुपारी
त्यानुसार ६ जुलैला उत्तम आणि सविताला बिहाडी गावात वाद मिटवण्यासाठी बोलावले व त्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीत फेकले. त्यानंतर ही आत्महत्या दर्शवण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला.
असा झाला उलगडा… –
वेणा नदीच्या पुलाखाली पोलिसांना दोन्ही मृतदेहांना पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने मोठ्या दगडाला बांधून फेकल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर पोलिसांनी जवळचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. खबऱ्यांकडून माहिती घेतल्यावर दोघेही बिहाडी गावातील असल्याचे स्पष्ट झाले. खून झालेल्यांच्या घरमालकाकडूनही उत्तमचे भावांशी पटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन बोडखे कुटुंबाची चौकशी सुरू केली. प्रथम त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी हिसका दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केला.