नागपूर : वन्यप्राणी आणि विशेषकरुन वाघ पाहायचा असेल तर उन्हाळ्याचा ऋतू सर्वात चांगला. हल्ली सर्वच अभयारण्यात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होत आहे आणि त्यामुळेच पर्यटकांचा जंगलाकडे येण्याचा ओघही वाढत आहे. मात्र, वाघांची पाण्यातील जलक्रीडा पाहायची असेल तर उन्हाळ‌याचा ऋतू उत्तम. कारण या कालावधीत पाणवठ्यातील वाघ, वाघीण किंवा त्यांचे कुटुंब पर्यटकांना कधीच निराश करत नाहीत.

आतापर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातच हे दृश्य पाहायला मिळत होते, पण आता राज्यातील सर्वच अभयारण्यात हे दृश्य दिसायला लागले आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात खुर्सापार गेटजवळ ‘बी-२’ वाघीण आणि तिच्या बछड्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘पेंच सब्बर पाशा’ यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे.

पेंच व्याघ्रप्रकल्पात अलीकडच्या काही वर्षात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात ‘बी-२’ म्हणजेच ज्या वाघिणीला ‘कॉलरवाली’ म्हणूनही ओळखले जाते, त्या वाघिणीचे देखील योगदान आहे. तिची भ्रमंती आणि एकूणच या वाघिणीचा अभ्यास करण्यासाठी तिला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्यामुळे काही वन्यजीवप्रेमी तिला ‘कॉलरवाली’ म्हणून देखील ओळखतात. खुर्सापार गेट हे पेंच व्याघ्रप्रकल्पात आहे आणि अलीकडच्या काळात व्याघ्रदर्शनामुळे हे गेट चांगलेच लोकप्रिय झाले आहे. विशेषकरुन ‘बी-२’ ही वाघीण आणि तिचे बछडे वारंवार याच गेटच्या परिसरात फिरताना दिसून येतात.

त्यामुळे या वाघिणीमुळेच खुर्सापार गेट प्रसिद्ध झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अवकाळी पावसाचे डोकावणे सुरूच असले तरी उन्हाचा तडाखा अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांची झळ जशी माणसांना बसते, तशीच ती प्राण्यांना देखील बसते. त्यामुळे पाणवठ्यात जाऊन बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही शिल्लक नसतो. खुर्सापार गेटजवळ असलेल्या पाणवठ्यात ‘बी-२’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांनी ठाणच मांडले. उन्हाची काहिली कमी झाल्यानंतर मात्र तिच्या बछड्यांनी पाण्यातच मस्ती सुरू केली. पाण्यात डुंबण्याचा मोह कुणाला आवरत नाही.उन्हाळ्यात माणसे जिथे पाणी दिसले की पोहण्यासाठी सूर मारतात, तिथे आता हे वन्यप्राणी देखील मागे राहात नाहीत आणि वाघाचे कुटुंब असेल तर मग बघायलाच नको. ‘बी-२’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांनी पाण्यातच ठाण मांडले. उन्हाची काहिली जसजशी कमी होऊ लागली, तसतसे मग ते पाणवठ्यातून बाहेर निघाले.