नोकरी देण्याच्या बहाण्याने सौदी अरेबियाला नेऊन नागपूरच्या एका महिलेची दोन लाखांमध्ये विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सौदी अरेबियातील एका दाम्पत्यासह नागपुरातील अकिला बेगम रा. बोरगांव, मुंबईतील अब्दुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आसमा, खालिद आणि मुजाहिद रा. सौदी अरेबिया अशी इतर आरोपींची नावे आहे.

पीडित महिला खासगी रुग्णालयात काम करीत होती. सप्टेंबर २०१६ मध्ये पीडित महिला स्टारबसने प्रवास करीत असताना तिची अकिलासोबत ओळख झाली. अकिलाने तिला २० हजार रुपये महिन्याने सौदी अरेबियात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. याला बळी पडत महिला तिच्यासह मुंबईला गेली. तेथून जयपूर आणि नंतर तिला शारजॅहा येथे पाठविले. तेथील एका एजन्टने पीडित महिलेला दुबई, रेयाद व नंतर हाईल येथे पाठविले. तेथे शेख कुटुंबातील खालिद भेटला. दोघे पीडितेला घरी घेऊन गेले. काही दिवस चांगले वागवून त्यानंतर तिच्याकडून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत घरगुती कामे करवून घेत होते. तिला जेवायलाही देणे बंद केले. सतत तीन महिने तिच्यावर अत्याचार केला, असे पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

भारतीय दूतावासाची मदत

अत्याचार असहय झाल्याने महिलेने सुटकेचा प्रयत्न केला. एकदा ती शेखच्या घरातून पळाली आणि बाजारात पोहोचली. तिने एका दुकानदाराशी संपर्क साधला असता त्याने पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले. मात्र, संपर्क करण्यापूर्वीच खालिदने पकडले व जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्यांदा ती घरातून पळाली व थेट भारतीय दूतावासाशी संपर्क केला. त्यानंतर तिला नागपुरात परत पाठविण्यात आले.