आठ दिवसांत सक्रिय करोनाग्रस्तांत साडेतीन पटींनी वाढ
नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत तब्बल ४४ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या थेट १५२ रुग्णांवर पोहोचली आहे. २० डिसेंबरला जिल्ह्यात ३९ सक्रिय करोनाग्रस्त होते. २८ डिसेंबरची रुग्णसंख्या बघता आठ दिवसांत साडेतीन पटीहून अधिकने सक्रिय करोनाग्रस्त वाढलेले दिसत आहेत.
सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील १०८, ग्रामीणचे १४, जिल्ह्याबाहेरील १४ अशा एकूण १५२ रुग्णांचा समावेश आहे. ही संख्या २० डिसेंबरला शहरात ३०, ग्रामीणला ६, जिल्ह्याबाहेरील ३ अशी एकूण ३९ रुग्ण होती. दिवसभरात शहरात ३४, ग्रामीणला ३, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ४४ करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ७०८, ग्रामीण १ लाख ४६ हजार २६३, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ९३३ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ९०४ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २ हजार ८१०, ग्रामीणला १ हजार ११७ असे एकूण ३ हजार ९८६ चाचण्या झाल्या. जिल्ह्यात दिवसभरात एकही मृत्यू नसल्याने मंगळवारी शहरात ५,८९३, ग्रामीण २,६०४, जिल्ह्याबाहेरील १,६२५ असे एकूण १०,१२२ इतक्या मृत्यूची नोंद होती.
करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर
शहरात दिवसभरात १ व्यक्ती करोनामुक्त झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ६९१, ग्रामीण १ लाख ४६ हजार २६३, जिल्ह्याबाहेरील ५,२९४ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ६३० व्यक्तींवर पोहचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९२ टक्के होते. जिल्ह्यात २३ डिसेंबरला करोनामुक्तांचे हे प्रमाण ९७.९४ टक्के होते.
विदेशात प्रवास करणारे १२ संशयित ‘एम्स’मध्ये
विदेशात प्रवास करून नागपुरात परतलेले व करोनाचे निदान झालेले १२ संशयित ओमायक्रॉनग्रस्तांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. इतर वार्डात करोनाच्या १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विदेशात प्रवासाचा इतिहास असलेल्यांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या अहवालाची प्रतीक्षा आहे.
ओमायक्रॉनचा दुसरा रुग्णही करोनामुक्त
दुबईहून नागपुरात परतलेला व धंतोली झोन परिसरात राहणारा तरुणही करोनामुक्त झाला आहे. तो दुबईला शिकतो. भारतात परतल्यावर चाचणी केली असता त्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाच्या जनुकीय चाचणीत त्याला ओमायक्रॉन असल्याचे स्पष्ट झाले. त्याला एम्सला दाखल करण्यात आले होते. २७ डिसेंबरला तो करोनामुक्त झाला. त्याला सात दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या रुग्णालाही एकही लक्षणे नसल्याने औषध न घेता संतुलित आहार व आवश्यक आरामानेच बरे होणे शक्य झाले. सध्या एम्समध्ये एका ओमायक्रॉनग्रस्तावर उपचार सुरू आहेत.
