पोलीस शिपायांवरील हल्ल्यांची शृंखला थांबण्याची अद्याप चिन्हे नाहीत. आता कामठी पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाला मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भोजराज बांते असे मारहाण झालेल्या शिपायाचे नाव आहे.

रविवारी कामठीतील एका महिलेच्या घरी चोरी झाली. त्यावेळी महिलेने पोलिसांत तक्रार दिली आणि शेजारी राहणाऱ्या सुनील मराठे (३७) आणि त्याचा मुलगा प्रवीण मराठे (१२) यांच्यावर संशय व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी महिलेला संबंधितांवर संशय व्यक्त करण्याचे कारण विचारले. त्यावेळी ती म्हणाली की, यापूर्वी दोघाही बापलेकांनी आपल्याकडे चोरी केली होती आणि हटकल्यानंतर पैसे परत केले होते. त्यामुळे आताही झालेल्या चोरीत त्यांचाच हात असावा, असा संशय आहे.

त्या अनुषंगाने भोजराज बांते आणि इतर पोलीस कर्मचारी सुनील मराठेच्या घरी गेले. रस्त्यावरून प्रवीणला आवाज दिला.

त्यावेळी मुलाऐवजी बाप घराबाहेर आला आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचारी बांते यांच्या कानशिलात लगावली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी सुनील यास अटक केली.