नागपूर : राज्यातील वाघांच्या शिकारीचे सावट अजूनही दूर झालेले नाही. बहेलिया आणि स्थानिक शिकाऱ्यांचा धोका वाघांना कायम आहे.
अशातच आता महाराष्ट्रातील वाघिणीचा मध्यप्रदेशात मृत्यू झाला असून हा शिकारीचा प्रकार असल्याची माहिती आहे.
२०१३-२०१६ च्या दरम्यान मेलघाटातून मोठ्या प्रमाणात शिकारीचे सत्र उघडकीस आले होते. त्यावेळी पहिल्यांदा बहेलिया शिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करू शकतात, हे पाहून सारेच धास्तावले.
बहेलिया ही मध्यप्रदेशातील शिकारी जमात असून वाघाच्या शिकारीत त्यांचा हातखंडा आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला मध्यप्रदेशची सीमा लागून असल्याने बहेलिया शिकाऱ्यांनी त्याचा फायदा घेत मेळघाटातील वाघांच्या शिकारी करून अवयव नेले आणि महाराष्ट्रच्या वनखात्याला याचा सुगावा देखील लागला नाही. मात्र, त्यानंतर याच व्याघ्रप्रकल्पाच्या “मेळघाट क्राईम सेल” ने मोठी कामगिरी बजावली.
तब्बल दीडशेहून अधिक आरोपींना अटक केली. बहेलियांचा महाराष्ट्रातील वाघांचा मागोवा अजूनही थांबलेला नाही. रविवारच्या घटनेनंतर पुन्हा एकदा ही भीती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील शहापूर वनक्षेत्रातील गावातील भावसा वनक्षेत्रात रविवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती वाघिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. वीज पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
या संदर्भात मध्यप्रदेशातील वन अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली. शहापूर रेंजमधील भावसा वनक्षेत्रातील वनरक्षकांना विभाग क्रमांक ४२८ जवळ एका वाघिणीचा मृतदेह आढळला. शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील जांभूपाणी वन चौकीवरील भावसा कक्षात ही घटना उघडकीस आली. वनरक्षकांनी तातडीने वन परिमंडळ अधिकारी (बुरहानपूर) विघा भूषण सिंग यांना घटनेची माहिती दिली.
शवविच्छेदन दरम्यान असे दिसून आले की वाघीण गर्भवती होती आणि तिच्या पोटात तीन बछडे होते. विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मध्यप्रदेश राज्यातील वन विभागाने या प्रकरणात विलास आणि मुकद्दम या दोघांना अटक केली आणि त्यांच्यावर वन कायदा १९७२ च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मेळघाट व्याघरप्रकल्पाला मध्यप्रदेशची सीमा लागून असल्याने दोन्ही राज्यातून वाघ जात-येत असतात. मेळघाटातील या वाघिणीने महाराष्ट्राची सीमा ओलांडत मध्यप्रदेशात प्रवेश केला. मात्र, त्याठिकाणी तीचा पोटातील बचड्यांसह मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.